महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ५० :
सार्वजनिक शांततेस विशेष धोका निर्माण झाला असता जादा पोलीस कामावर ठेवणे :
१) जर राज्य शासनाच्या मते, कोणत्याही क्षेत्रात अशांततेची किंवा धोक्याची परिस्थिती असेल किंवा कोणत्याही क्षेत्रातील रहिवाशांच्या किंवा त्यांच्यापैकी कोणत्याही एका विशिष्ट गटाच्या वर्तणुकीवरुन जादा पोलीस कामावर ठेवणे इष्ट असेल तर त्यास, शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करुन,-
अ) ज्या क्षेत्रात जादा पोलीस कामावर ठेवावयाचे असतील ते क्षेत्र (ज्यास यात यापुढे अशांततेचे क्षेत्र असे म्हटले आहे),
ब) ज्या मुदतीकरिता जादा पोलीस कामावर ठेवावयाचे असतील ती मुदत, विनिर्दिष्ट करता येईल:
परंतु असे की, राज्या शासनाच्या मते जनतेच्या सर्वसामान्य हिताच्या दृष्टीने खंड (ब) अन्वये मुदत वाढविणे आवश्यक असेल तर त्याला असे करता येईल. जादा पोलिसाबाबतचा खर्च या कलमान्वये बसविलेला कर असेल आणि तो नंतरच्या पोटकलमांअन्वये विहित केलेल्या रीतीने वसूल करण्यात येईल.
२) पोट-कलम (१) खंड (अ) व (ब), अन्वये राज्य शासनाने दिलेला निर्णय अंतिम असेल.
३) अशी अधिसूचना काढण्यात आल्यावर राज्य शासनाला,-
अ) महानगरपालिकेच्या हद्दीत असलेल्या अशांततेच्या कोणत्याही क्षेत्रात नगरपालिका आयुक्त, जिल्हाधिकारी किंवा इतर कोणताही प्राधिकारी यास,
ब) नगरपालिकेच्या हद्दीतील कोणत्याही अशांततेच्या क्षेत्रात, नगरपालिका, जिल्हाधिकारी किंवा इतर कोणताही प्राधिकारी यास,
क) खंड (अ) व (ब) यांमध्ये विनिर्दिष्ट केलेल्या क्षेत्राबाहेरील कोणत्याही अशांततेच्या क्षेत्रात, जिल्हाधिकारी किंवा इतर कोणताही स्थानिक प्राधिकारी यास,
अशा जादा पोलिसांचा खर्च एकतर पूर्णपणे किंवा अंशत: अशांतता असलेल्या क्षेत्रात राहात असलेल्या सामान्यत: सर्व व्यक्तीकडून किंवा विशेषेकरुन अशा व्यक्तींच्वा कोणत्याही विवक्षित भागाकडून किंवा भागांकडून किंवा अशा व्यक्तींच्या वर्गाकडून किंवा वर्गांकडून आणि राज्य शासन निदेश देईल अशा प्रमाणात वसूल करण्याबद्दल फर्मावता येईल:
परंतु असे की, जेव्हा महानगरपालिकेच्या आयुक्तास किंवा नगरपालिकेस असा खर्च वसुल करण्याबद्दल निदेश देण्यात आला असेल तेव्हा अशा खर्चाच्या तीन टक्कयांहून अधिक नाही इतकी जादा रक्कम देखील वसुलीयोग्य असेल.
४) (एक) राज्य शासन महानगरपालिका आयुक्तास किंवा नगरपालिकेस असा कर व जादा रक्कम ही सामान्य कर किंवा मालमत्तेवरील कर वाढवून वसूल करण्याबद्दल भाग पाडता येईल, आणि असा जादा कर सर्व नगरपालिका प्रभागांत (वार्डात) किंवा राज्य शासन निदेश देईल अशा उपविभागांत किंवा त्यांच्या विभागात बसविण्यात व वसूल करण्यात येईल. या पोट-कलमान्वये बसविलेल्या सामान्य करातील व मालमत्तेवरील करातील वाढ ही, ती भरण्यास जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून त्याच्याकडून येणे असलेला सामान्य कर किंवा मालमत्तेवरील कर ज्या रीतीने वसूल केला जातो त्याच रीतीने महानगरपालिका आयुक्त किंवा नगरपालिका यांच्याकडून वसूल करण्यात येईल. संबंधित नगरपालिका अधिनियमाचे उपबंध अशा कोणत्याही जादा वाढीस जणू ती रक्कम उक्त अधिनियमाखाली बसविलेल्या सामान्य कराचा किंवा मालमत्तेवरील कराचा भाग आहे असे समजून लागू असतील. अशी वाढ अशा नगरपालिका प्रभागातील किंवा उप-विभागातील किंवा विभागातील सामान्य कर किंवा मालमत्तेवरील कर याबरोबरच अशा मालमत्तांवरील बोजा असेल.
(दोन) तसेच राज्य शासनाला असा खर्च व जादा रक्कम, पोट-कलम (३) अन्वये ती देण्यास जबाबदार असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून, राज्य शासन निदेश देईल अशा रीतीने वसूल करण्याबद्दल महानगरपालिका आयुक्तास किंवा नगरपालिकेस फर्मावता येईल.
(तीन) जेव्हा महानगरपालिका आयुक्त किंवा नगरपालिका असा कोणताही कर बसविण्यात किंवा अशी वसुली करण्यात कसूर करील तेव्हा राज्य शासनाला असा कर बसविण्याबद्दल, वसूल करण्याबद्दल किंवा अशी वसुली करण्याबद्दल जिल्हाधिकाऱ्याला निदेश देता येईल.
५) जिल्हाधिकाऱ्याने किंवा इतर प्राधिकाऱ्याने या कलमान्वये वसूल करावयाची प्रत्येक रक्कम, जणू ती भरण्यास पात्र असलेल्या व्यक्तीने देणे असलेली जमीन महसुलाची थकबाकी आहे असे समजून वसुलीयोग्य असेल.
६) राज्य शासनाने आदेश देऊन अशा जादा पोलिसांच्या खर्चाचा कोणताही भाग सोसण्याच्या दायित्वापासून कोणत्याही व्यक्तीस माफी देणे हे विधिसंमत असेल.
७) महानगरपालिका आयुक्ताने किंवा नगरपालिकेने पोट-कलम(४) किंवा पोट-कलम (५) अन्वये वसूल केलेल्या एकूण रकमेतून – मग ती रक्कम हा अधिनियम अमलात येण्यापुर्वी किंवा अमलात आल्यानंतर वसूल केलेली असो-खर्चाची रक्कम राज्य शासनाला देण्यात येईल व कोणतीही शिल्लक असल्यास ती, संबंधित नगरपालिका अधिनियमान्वये स्थापन केलेल्या नगरपालिका निधीत जमा केली पाहिजे. खर्चाची अशी रक्कम प्रत्येक तिमाहीस राज्य शासनाला देण्यात येईल.
स्पष्टीकरण :
या कलमातील रहिवासी ही संज्ञा जेव्हा कोणत्याही क्षेत्राच्या संबंधात वापरली असेल तेव्हा तीत, ज्या व्यक्ती स्वत: किंवा आपल्या अभिकत्र्यामार्फ त किंवा नोकरामार्फ त अशा क्षेत्रात जमिनीचा किंवा इतर स्थावर मालमत्तेचा भोगवटा करीत असतील किंवा ती धारण करीत असतील अशा व्यक्तींचा आणि जे जमीनमालक स्वत: किंवा आपल्या अभिकत्र्यामार्फ त किंवा नोकरामार्फ त, अशा क्षेत्रातील जमीन धारण करणाराकडून किंवा तिच्या भोगवटादाराकडून भाडे वसूल करीत असतील अशा जमीनमालकांचा, ते तेथे प्रत्यक्ष राहत नसले तरी, समावेश होतो.