महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ४८ :
मोठ्या कामावर आणि कामाजवळ लावलेल्या व्यक्तींच्या वर्तणुकीबद्दल शंका वाटत असेल तर जादा पोलीस कामावर ठेवणे :
१) जेव्हा जेव्हा राज्य शासनाला किंवा सक्षम प्राधिकऱ्याला,-
अ) चालू असलेले कोणतेही मोठे काम किंवा करण्यात येणारा कोणताही सार्वजनिक मनोरंजनाचा कार्यक्रम यामुळे रहदारीस अडथळा होण्याचा किंवा लोक मोठ्या संख्येत त्याकडे आकर्षिले जाण्याचा संभव आहे असे, किंवा
ब) कोणत्याही जागी बांधण्यात येत असलेल्या किंवा चालू असलेल्या कोणत्याही रेल्वेवर, कालव्यावर किंवा इतर सार्वजनिक कामावर किंवा कारखान्यात किंवा कारखान्यावर किंवा इतर व्यापारी संस्थेत किंवा संस्थेवर लावलेल्या इतर व्यक्तींच्या वर्तणुकीवरुन किंवा या अमुक प्रकारचे वर्तन करतील असे वाजवीरीत्या वाटल्यावरुन त्या ठिकाणी जादा पोलीस ठेवणे आवश्यक आहे असे दिसून येईल तेव्हा तेव्हा राज्य शासन किंवा सक्षम प्राधिकारी यास, त्यास योग्य वाटतील इतके जादा पोलीस त्या ठिकाणी पाठविता येतील आणि ते पोलीस जितके दिवस कामावर ठेवणे आवश्यक आहे असे त्यास वाटेल तितके दिवस ते तेथे ठेवता येतील.
२) असे जादा पोलीस, ते काम, मनोरंजनाचा कार्यक्रम, कारखाना किंवा व्यापारी संस्था यांना जी व्यक्ती बांधीत असेल किंवा चालवीत असेल किंवा कामकाज चालवीत असेल तिच्या खर्चाने कामावर ठेवण्यात येतील आणि उक्त व्यक्ती यथास्थिती राज्य शासन किंवा सक्षम प्राधिकारी वेळोवेळी आदेश देईल त्या दरांनी त्याचा खर्च देईल.