Bp act कलम ४० : धार्मिक समारंभ वगैरेच्या ठिकाणी सुव्यवस्था राखणेबद्दल आदेश काढणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ४० :
धार्मिक समारंभ वगैरेच्या ठिकाणी सुव्यवस्था राखणेबद्दल आदेश काढणे:
१) कोणत्याही रस्त्यावर अथवा सार्वजनिक ठिकाणी प्रत्यक्ष चालू असलेल्या किंवा उद्देशित अशा ज्या धार्मिक किंवा समारंभयुक्त किंवा सामुदायिक देखाव्याच्या किंवा प्रदर्शनाच्या किंवा संघटित जमावाच्या संबंधात किंवा जे चालवण्याच्या किंवा ज्यात सहभागी होण्याच्या संबंधात फार मोठा शांतताभंग होऊ शकेल असा एखादा विवाद किंवा तंटा अस्तित्वात आहे असे एखाद्या सक्षम अधिकाऱ्याला दिसून येईल अशा कोणत्याही प्रकरणात, हितसंबंध असलेल्या पक्षकारांचे व व्यक्तींचे स्पष्ट व कायदेशीर हक्क व रुढ असलेले रीतीरिवाज लक्षात घेऊन संबंधित व्यक्तींनी परस्परांशी व जनतेशी कसे वागावे याबद्दल त्याप्रसंगी जे आदेश देणे त्यास आवश्यक व वाजवी वाटेल असे आदेश देता येतील. असा प्रत्येक आदेश तो ज्या शहरात अगर जागी अमलात यावयाचा असेल त्या शहरात अगर जागी प्रसिद्ध करण्यात येईल आणि सर्व संबंधित व्यक्तींनी त्यास अनुसरुन वागणे बंधनकारक असेल.
२) पोट-कलम (१) अन्वये दिलेला कोणताही आदेश हा, अधिकारिता असलेल्या न्यायलयाने दिलेल्या कोणत्याही हुकूमनाम्यास, निषेधआज्ञेस किंवा आदेशास अधीन राहील आणि ज्या कोणत्याही लोकांस तो आदेश लागू असेल त्या लोकांच्या हक्काच्या व कर्तव्याच्या संबंधाने, हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीच्या फिर्यादीवरुन, दाव्यावरुन किंवा अर्जावरुन त्या न्यायालयाने दिलेल्या कोणत्याही निर्णयाशी, हुकूमनाम्याशी निषेधआज्ञेशी किंवा आदेशाशी तो विसंगत आहे असे असा आदेश देणाऱ्या प्राधिकाऱ्याच्या दृष्टोत्पत्तीस आणून दिले तर तो मागे घेण्यात येईल किंवा त्यातफेरफार करण्यात येतील.

Leave a Reply