महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ३८ :
गायन-वादन, आवाज किंवा गोंगाट चालू ठेवण्यास मनाई वगैरे करण्याचे अधिकार :
१) पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या प्रतिवृत्तावरुन किंवा त्यास मिळालेल्या इतर माहितीवरुन, जर आयुक्ताची किंवा १.(अधीक्षकाची) अशी खात्री होईल की, जवळपास राहणाऱ्या किंवा जवळपासच्या मालमत्तेचा भोगवटा करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीस त्रास, अशांतता, अस्वस्थता किंवा नुकसान होऊ नये किंवा त्रास, अशांतता, अस्वस्थता किंवा नुकसान होण्याचा धोका निर्माण होऊ नये तर, लेखी आदेश देऊन पुढील गोष्टींना आळा घालण्यासाठी, मनाई करण्यासाठी, त्यांचे नियंत्रण किंवा विनियमन करण्यासाठी त्यास योग्य वाटतील अशा सूचना कोणाही व्यक्तीस देता येतील:
अ) कोणत्याही जागेत किंवा जागेवर–
(एक)कोणतेही गायन किंवा वाद्यसंगीत,
(दोन) कोणतेही वाद्य, साधन, पात्र किंवा जे २.(आवाज किंवा त्याचा प्रतिध्वनी निर्माण करु शकेल) असे यंत्र वाजविल्यामुळे, बडविल्यामुळे, आपटल्यामुळे किंवा ेकल्यामुळे किंवा कोणत्याही प्रकारे वापरल्यामुळे होणारा आवाज करणे किंवा चालू ठेवणे, किंवा
ब) कोणत्याही जागेत किंवा जागेवर, ज्याचा परिणाम आवाज होण्यात होतो किंवा ज्यामुळे आवाज होतो, असा व्यापार, व्यवसाय किंवा काम चालविणे;
(२) पोट-कलम(१) अन्वये शक्ती प्रदान केलेल्या प्राधिकाऱ्यास एकतर स्वत: होऊन किंवा पोट-कलम (१) अन्वये दिलेल्या आदेशामुळे पीडित झालेल्या व्यक्तीने अर्ज केल्यानंतर, असा कोणताही आदेश एक तर विखंडित करता येईल किंवा त्यातफेरबदल करता येईल किंवाफेरफार करता येईल.
परंतु असे की, अशा कोणत्याही अर्जाची विल्हेवाट लावण्यापुर्वी असा प्राधिकारी अर्जदारास स्वत: किंवा वकिलामार्फ त हजर होण्याची आणि आदेशाविरुद्ध कारण दाखविण्याची संधी देईल आणि असा कोणताही अर्ज तो सर्वस्वी किंवा अंशत: नामंजूर करील तर अशा नामंजुरीची कारणे तो नमूद करुन ठेवील.
——–
१. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ९ अन्वये आवाज निर्माण करु शकेल या मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.