महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ३७ :
अव्यवस्थेला प्रतिबंध करणेसाठी विवक्षित कृतींना मनाई करण्याचे अधिकार :
१) आयुक्त आणि जिल्हा दंडाधिकारी यांस आपापल्या प्रभाराखाली असलेल्या क्षेत्रात सार्वजनिक शांतता किंवा सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी त्यास आवश्यक वाटेल त्या त्या वेळी व तितक्या मुदतीपर्यंत जाहीर रीतीने प्रख्यापित केलेल्या किंवा व्यक्तींना उद्देशून प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेद्वारे, कोणत्याही शहरात, गावात किंवा जागी किंवा अशा कोणत्याही शहराच्या, गावाच्या किंवा जागेच्या आसपास खालील गोष्टीस मनाई करता येईल:
अ) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले दंड, बंदुका, सुरे काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी इतर कोणतीही वस्तू बाळगणे,
ब) कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बरोबर नेणे,
क) दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे,
ड) व्यक्तींचे किंवा प्रेते किंवा आकृती किंवा त्यांच्या प्रतिमा यांचे प्रदर्शन करणे,
इ) सार्वजनिक रीतीने घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाद्ये वाजविणे,
फ) सभ्यता अगर नीती यास विरुद्ध असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात आणतील किंवा ज्यांच्यामुळे राज्य शासन उलथुन पडण्याचा संभव आहे असे अशा प्राधिकाऱ्यास वाटेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि अशी चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकात प्रसार करणे.
२) अशा मनाईचे उल्लंघन करुन जर कोणतीही व्यक्ती अशी कोणतीही वस्तू बरोबर घेऊन जाईल किंवा कोणताही क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा क्षेपणास्त्र जवळ बाळगील तर ती कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याकडून नि:शस्त्र केली जाण्यास किंवा क्षारक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ किंवा क्षेपणास्त्र त्यांच्याकडून जप्त केले जाण्यास पात्र होईल आणि अशा तऱ्हेने जप्त केलेली वस्तू, क्षारक पदार्श, स्फोटक पदार्थ किंवा क्षेपणास्त्र हे सरकारनामा होईल.
३) पोट-कलम (१) अन्वये शक्ती प्रदान केलेल्या प्राधिकाèयच्या मते सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी कोणत्याही जमावास किंवा मिरवणुकीस जेव्हा जेव्हा व जितक्या मुदतीपर्यंत मनाई करणे आवश्यक असेल तेव्हा तेव्हा त्याला, लेखी आदेश देऊन त्याद्वारे, तितक्या मुदतीपर्यंत तशी मनाई करता येईल:
परंतु असे की, अशी कोणतीही मनाई राज्य शासनाच्या मंजुरीशिवाय पंधरा दिवसांपेक्षा जास्त मुदतीपर्यंत अमलात राहणार नाही.
४) त्याचप्रमाणे पोट-कलम (१) अन्वये शक्ती प्रदान केलेल्या प्राधिकाऱ्यास जाहीर नोटिशीद्वारे कोणताही रस्ता किंवा सार्वजनिक जागा सार्वजनिक प्रयोजनासाठी राखून ठेवता येईल आणि प्राधिकारी विहित करील त्या शर्तीनुसार असेल ते खेरीजकरुन लोकांस अशा राखून ठेवलेल्या जागी जाण्यास मनाई करता येईल.