महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ३५ :
वेगळ्या राखून ठेवलेल्या जागांशिवाय इतर जागी प्रेतांची विल्हेवाट लावण्यास मनाई करण्याबाबत नियम करण्याचे अधिकार:
१) सक्षम प्राधिकाऱ्यास, प्रेताची विल्हेवाट लावण्याकरिता वेगळ्या राखून ठेवलेल्या जागांव्यतिरिक्त इतर जागी प्रेतांचे दहन करुन, ती पुरुन किंवा अन्य तऱ्हेने त्यांची विल्हेवाट लावण्यास मनाई करण्याबाबत वेळोवेळी नियम करता येतील:
परंतु असे की, ज्या कोणत्याही शहरात किंवा जागेत अशा रितीने जागा राखून ठेवण्यात आल्या नसतील त्या शहराच्या किंवा जागेच्या बाबतीत असे कोणतेही नियम करता कामा नये.
परंतु आणखी असे की, उक्त सक्षम प्राधिकाऱ्यास किंवा त्याने याबाबत प्राधिकृत केलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास कोणत्याही व्यक्तीने त्याच्याकडे अर्ज केल्यानंतर, अशी रीतीने राखून ठेवलेल्या जागेव्यतिरिक्त इतर जागेत कोणत्याही मृत व्यक्तीच्या प्रेताची विल्हेवाट लावण्याने त्याच्या मते वाहतुकीस अडथळा होण्याचा किंवा सार्वजनिक शांततेचा भंग होण्याचा संभव नसेल किंवा तसे करण्यास इतर कोणत्याही कारणावरुन हरकत घेण्याजागी नसेल तर, अशा व्यक्तीस स्वेच्छानिर्णयानुसार अशा रीतीने प्रेताची विल्हेवाट लावण्याची परवानगी देता येईल.
२) पोट-कलम (१) अन्वये कोणत्याही नियमात, निरनिराळ्या जातींतील किंवा जातींच्या विभागातील व्यक्तींच्या प्रेतांची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळ्या राखून ठेवलेल्या जागा विनिर्दिष्ट केल्या पाहिजेत.
३) असे सर्व नियम, पूर्वप्रसिद्धीच्या शर्तीस अधीन असतील आणि मुंबई सर्वसाधारण परिभाषा अधिनियम, १९०४, कलम २४ खंड (क) अन्वये विनिर्दिष्ट करावयाची तारीख ही प्रस्तावित नियमाचा मसुदा ज्या तारखेच प्रसिद्ध करण्यात आला असेल त्या तारखेपासून दोन महिन्यांच्या मुदतीपेक्षा आधीची असणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनाकरिता, प्रेताची विल्हेवाट लावण्यासाठी वेगळी राखून ठेवलेली जागा या संज्ञेचा अर्थ, त्या वेळी अमलात असलेली कोणतीही रुढी, प्रघात किंवा विधी या अन्वये अशा प्रयोजनाकरिता राखून ठेवलेली जागा असा होतो.