महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२:
अपर पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक:
१) या अधिनियमाच्या उपबंधान्वये किंवा तदनुसार त्या बाबतीत विनिर्दिष्ट केलेला प्राधिकारी ठरवील अशा मुदतीसाठी व अशा दर्जाचे किंवा श्रेणीचे अपर पोलीस अधिकारी अशा उपबंधात दिलेल्या प्रयोजनासाठी नेमता किंवा प्रतिनियुक्त करता येतील.
२) नेमलेल्या प्रत्येक अपर पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक झाल्यानंतर :
अ) त्यास राज्य शासनाने याबाबत मंजूर केलेल्या
नमुन्यातील एक प्रमाणपत्र मिळेल;
ब) पोलीस अधिकाऱ्याकडे निहित असलेल्या सर्व शक्ती, विशेषाधिकार व कर्तव्ये किंवा त्यांपैकी प्रमाणपत्रात विशेष रीतीने नमूद करण्यात आल्या असतील अशा शक्ती, विशेषाधिकार व कर्तव्ये त्याजकडे निहित होतील; आणि
क)तो, यखास्थिती, आयुक्ताच्या किंवा १.(अधीक्षकाच्या) आदेशांस अधीन असेल.
३) अशा अपर पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक किंवा प्रतिनियुक्ती अशा पोलिसांची आवश्यकता असणाऱ्या कोणत्याही व्यक्तीने विनंती केल्यास, करता येईल आणि अशा नेमणुकीचा खर्च या अधिनियमानुसार किंवा अधिनियमान्वये किंवा त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही विधीअन्वये तरतूद केलेल्या रीतीने वसूल करण्यात येईल.
——–
१. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याचे कलम ३, अनुसूची अन्वये जिल्हा अधीक्षक याऐवजी समाविष्ट केले.