Bp act कलम २२न : पोलीस कर्मचारी वर्ग यांचा सामान्य पदावधी, आणि सक्षम प्राधिकारी :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२न :
पोलीस कर्मचारी वर्ग यांचा सामान्य पदावधी, आणि सक्षम प्राधिकारी :
१.(१) पोलीस दलातील पोलीस कर्मचारीवर्गाचा सामान्य पदावधी हा, पदोन्नती आणि नियत सेवावधी यांच्या अधीनतेने, खालीलप्रमाणे असेल :-
अ) पोलीस उप अधीक्षक किंवा सहायक पोलीस आयुक्त व त्यावरील दर्जाचे पोलीस अधिकारी, यांचा सामान्य पदावधी हा पदस्थापनेच्या एका ठिकाणावर दोन वर्षे असेल;
ब) पोलीस उप निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस निरीक्षक यांच्या दर्जाचे पोलीस अधिकारी यांचा सामान्य पदावधी हा पोलीस ठाणे किंवा शाखा येथे दोन वर्षे, एखाद्या जिल्ह्यात चार वर्षे आणि परिक्षेत्रस्तरावर आठ वर्षे इतका असेल, तथापि जिल्ह्यातील स्थानिक गुन्हे शाखा व विशेष शाखा आणि आयुक्तालयातील गुन्हे शाखा व विशेष शाखा यांच्याकरिता सामान्य पदावधी हा तीन वर्षे असेल;
ड) पोलीस उप निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा सामान्य पदावधी हा मुंबई खेरीजच्या इतर आयुक्तालयांत सहा वर्षे आणि मुंबई येथील आयुक्तालयात आठ वर्षे इतका असेल;
ई) विशेषीकृत अभिकरणामधील पोलीस उप निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक आणि पोलीस निरीक्षक यांच्या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्याचा सामान्य पदावधी हा तीन वर्षे इतका असेल.)
सर्वसाधारण बदलीकरिता सक्षम प्राधिकारी पुढीलप्रमाणे असतील :-
अ) भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी – मुख्यमंत्री;
ब) पोलीस उप-अधीक्षक व त्यावरील दर्जाचे महाराष्ट्र पोलीस सेवेतील अधिकारी – गृहमंत्री;
क) पोलीस निरीक्षक दर्जापर्यतचे अधिकारी –
अ) पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २
ब) परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ.
क) आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ
२.(ड) जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ ;
ई) विशेषीकृत अभिकरणस्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ.)
परंतु, राज्य शासनास, जर,-
अ) पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध शिस्तभंगाची कार्यवाही सुरु असेल किंवा योजलेली असेल; किंवा
ब) पोलीस कर्मचाऱ्यास न्यायालयाने दोषी ठरविलेले असेल ; किंवा
क) पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आलेले असतील; किंवा
ड) अन्यथा पोलीस कर्मचारी आपली कर्तव्ये पार पाडण्यास अक्षम झालेला असेल; किंवा
इ) पोलीस कर्मचारी कर्तव्यच्युतीबाबत दोषी असेल,
तर, कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याचा सामान्य पदावधी पूर्ण होण्यापूर्वीच त्याची बदली करता येईल.
२) पोट-कलम (१) मधील कारणांव्यतिरिक्त, अपवादात्मक प्रकरणांमध्ये, जनहितार्थ आणि प्रशासनिक निकडीनुसार, सक्षम प्राधिकारी पोलीस दलातील कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची मुदतपूर्व बदली करील.
३.(***)
४.(स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, सक्षम प्राधिकारी या शब्दप्रयोगाचा अर्थ, पुढीलप्रमाणे असेल :-
पोलीसकर्मचारी वर्ग – सक्षम प्राधिकारी
अ) भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी – मुख्यमंत्री;
ब) पोलीस उप-निरीक्षक व त्यावरील दर्जाचे महाराष्ट पोलीस सेवेतील अधिकारी – गृह मंत्री;
क) संबंधित परिक्षेत्र किंवा आयुक्तालय किंवा विशेषीकृत अभिकरण यांच्या बाहेरील बदल्यांकरिता, पोलीस निरीक्षकाच्या दर्जापर्यंतचे पोलीस कर्मचारीवर्ग – पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २;
ड) संबंधित परिक्षेत्र, आयुक्तालय किंवा विशेषीकृत अभिकरण यांच्यामधील बदल्यांकरिता, पोलीस निरीक्षकाच्या दर्जापर्यंतचे पोलीस कर्मचारीवर्ग – परिक्षेत्र, आयुक्तालय किंवा, यथास्थिती, विशेषीकृत अभिकरण यांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळे;
ई) जिल्ह्यामधील बदल्यांकरिता पोलीस निरीक्षकाच्या दर्जापर्यंतचे पोलीस कर्मचारी – जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :
परंतु, कोणतीही गंभीर तक्रार, अनियमतता, कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नाच्या बाबतीत, सर्वोच्च सक्षम प्राधिकरण, संबंधित पोलीस आस्थापना मंडळाच्या कोणत्याही शिफारशीशिवाय, कोणत्याही पोलीस कर्मचाऱ्याची बदली करु शकेल.)
——-
१. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ६ अन्वये पोलीस दलातील पोलीस कर्मचारीवर्गाचा एका पदावरीला किंवा एका कार्यालयातील सामान्य पदावधी हा, पदोन्नती आणि नियत सेवावधी यांच्या अधीनतेने दोन वर्षे इतका असेल या मजकुराऐवजी समाविष्ट केले.
२. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ६ अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ६ अन्वये परंतुक वगळण्यात आले.
४. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ६ अन्वये मूळ स्पष्टीकरणाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
सुधारणे पुर्वी :
(स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, सक्षम प्राधिकारी या शब्दप्रयोगाचा अर्थ, पुढील प्रमाणे असेल :-
अ) भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी – मुख्यमंत्री;
ब) पोलीस उप-निरीक्षक व त्यावरील दर्जाचे महाराष्ट पोलीस सेवेतील अधिकारी – गृह मंत्री;
क) सहायक पोलीस उप-निरीक्षक दर्जापर्यतचे पोलीस कर्मचारी – पोलीस महासंचालक व महानिरीक्षक.)

Leave a Reply