महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ग :
परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :
१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ या नावाने संबोधण्यात येणारे एक मंडळ घटित करील.
२) परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :-
अ) परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक – अध्यक्ष;
ब) परिक्षेत्रामधील दोन वरिष्ठतम पोलीस अधीक्षक – सदस्य;
क) परिक्षेत्र पोलीस महानिरीक्षक याच्या कार्यालयातील वाचक (पोलीस उप-अधीक्षक) – सदस्य-सचिव :
परंतु, उपरोक्त सदस्यांपैकी एकही सदस्य मागासवर्गातील नसेल तर, राज्य शासन, अशा प्रवर्गातील, पोलीस अधीक्षक या दर्जाच्या अतिरिक्त सदस्याची नेमणूक करील.
स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, मागास वर्ग या शब्दप्रयोगाचा अर्थ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग, असा आहे.