महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२आय :
आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ :
१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ या नावाने संबोधण्यात येणारे एक मंडळ घटित करील.
२) आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :-
अ) पोलीस आयुक्त – अध्यक्ष ;
ब) पोलीस सह आयुक्त किंवा अपर आयुक्त किंवा उप-आयुक्त दर्जाचे दोन वरिष्ठतम अधिकारी – सदस्य;
क) पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) – सदस्य-सचिव :
परंतु, उपरोक्त सदस्यांपैकी एकही सदस्य मागासवर्गातील नसेल तर, राज्य शासन, अशा प्रवर्गातील, पोलीस उप-आयुक्त या दर्जाच्या अतिरिक्त सदस्याची नेमणूक करील.
स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, मागास वर्ग या शब्दप्रयोगाचा अर्थ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग, असा आहे.