Bp act कलम २२अ: १.(रेल्वे पोलिसांची नेमणूक :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२अ:
१.(रेल्वे पोलिसांची नेमणूक :
१) राज्य शासनास, शासकीय राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, ते विनिर्दिष्ट करील अशी रेल्वे क्षेत्रे अंतर्भूत असलेले एक किंवा अधिक विशेष पोलीस जिल्हे निर्माण करता येतील. आणि अशा प्रत्येक विशेष पोलीस जिल्ह्यासाठी एक पोलीस अधीक्षक २.(एक किंवा अनेक सहायक अधीक्षक व उप अधीक्षक) व त्यास योग्य वाटतील असे इतर पोलीस अधिकारी नेमता येतील.
२) ३.(महासंचालकाच्या व महानिरीक्षकाच्या) नियंत्रणास अधीन राहून, असे पोलीस अधिकारी आपापल्या प्रभाराखाली असलेल्या रेल्वेच्या प्रशासनाशी संबद्ध असलेली पोलिसांची कामे आणि राज्य शासन वेळोवेळी त्यांजवर सोपवील अशी इतर कामे पार पाडतील.
३) या पोट-कलमान्वये काम करण्यासाठी ज्यास राज्य शासन, सामन्यपणे किंवा विशेष रीतीने, शक्ती प्रदान करील, अशा उक्त पोलीस बलातील कोणत्याही व्यक्तीस, राज्य शासन याबाबत देईल अशा कोणत्याही आदेशास अधीन राहून विशेष जिल्ह्यात किंवा त्याच्या कोणत्याही भागात त्या जिल्ह्यातील पोलीस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या शक्तींपैकी कोणत्याही शक्तीचा वापर करता येईल आणि जेव्हा तो अशा शक्तीचा वापर करीत असेल तेव्हा तो, वर सांगितल्याप्रमाणे अशा कोणत्याही आदेशास अधीन राहून, पोलीस ठाण्याचा प्रभारी अधिकारी आहे व तो आपल्या ठाण्याच्या हद्दीत अशा अधिकाऱ्यांची कामे पार पाडीत आहे असे समजण्यात येईल.
४) राज्य शासन याबाबत देईल अशा कोणत्याही सर्वसाधारण किंवा विशेष आदेशास अधीन राहून, राज्याच्या प्रत्येक भागात अशा पोलीस अधिकाऱ्यांकडे, या अधिनियमान्वये किंवा त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही विधीअन्वये पोलीस अधिकाऱ्यांना ज्या शक्ती व विशेष अधिकार असतात व ज्या दायित्वांना ते अधीन असतात त्याच शक्ती व विशेष अधिकार निहित करण्यात येतील व ते त्या दायित्वांस अधीन असतील.)
४.(५) पोलीस अधीक्षकास, राज्य शासनाची आगाऊ परवानगी घेऊन या अधिनियमान्वये किंवा तद्नुसार, त्यास ज्या कोणत्याही शक्ती व कामे प्रदान करण्यात आली असतील त्यांपैकी कोणत्याही शक्ती व कामे सहायक अधीक्षकाकडे किंवा उप-अधीक्षकाकडे सोपवून देता येतील.)
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम १२ अन्वय हे कलम समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ४ (अ) अन्वये समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये १३ डिसेंबर १९८२ पासून हा मजकूर समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
४. सन १९६४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम ४ (ब) अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply