Bp act कलम १ : संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
प्रस्तावना :
प्रकरण १ :
प्रारंभिक :
कलम १ :
संक्षिप्त नाव, व्याप्ती व प्रारंभ :
मुंबई राज्यातील पोलीस दलाचे नियमन करण्यासंबंधीचा कायदा एकत्रित करण्याबाबत व त्यात सुधारणा करण्याबाबत अधिनियम
ज्याअर्थी, मुंबई राज्याचे जिल्हा पोलीस दल व बृहन्मुंबई पोलीस दल, १.(तसेच मुंबई राज्याच्या सौराष्ट्र कच्छ व हैदराबाद क्षेत्रांची व विदर्भ प्रदेशाची पोलीस दले) एकत्रित करुन त्यांचे एक सामाईक पोलीस दल बनविणे आणि संपूर्ण राज्यात उक्त दलाच्या कार्यविषयक नियंत्रणासंबंधात एकरुप पद्धती सुरु करणे इष्ट आहे;
आणि ज्याअर्थी, सार्वजनिक सुव्यवस्था राखण्यासाठी उक्त दलाचे विनियमन करण्यासंबंधीचा आणि राज्य शासनाने व उक्त दलातील व्यक्तींनी अधिकारांचा वापर करण्यासंबंधीचा व कामे पार पाडण्यासंबंधीचा कायदा एकत्रित करणे व त्यात सुधारणा करणे आवश्यक आहे;
त्याअर्थी, याद्वारे पुढीलप्रमाणे अधिनियम करण्यात येत आहे :-
———-
१)या अधिनियमास २.(महाराष्ट्र पोलीस अधिनियम) असे म्हणावे.
३.(२) तो संपुर्ण ४.(महाराष्ट्र ) राज्यास लागू असेल.)
५.(३) तो राज्य शासन शासकीय राजपत्रात अधिसूचना प्रसिद्ध करुन या बाबतीत जी तारीख विनिर्दिष्ट करील त्या तारखेस ६.(पुनर्रचनेपूर्वीच्या मुंबई राज्यात) ६.(अमलात येईल;आणि मुंबई पोलीस (व्याप्ती वाढविणे व सुधारणा) अधिनियम, १९५१, याद्वारे, तो राज्याच्या ज्या भागास लागू करण्यात आला, त्या भागात तो, राज्य शासन तत्सम अधिसूचनेद्वारे विनिर्दिष्ट करील अशा इतर तारखेस अमलात येईल.))
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३ अन्वये हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
२. सन २०१२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २४, अनुसूचीद्वारे अधिनियमाच्या नावात बदल करण्यात आला.
३. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ४ अन्वये मूळ पोट-कलमाऐवजी समाविष्ट करण्यात आला.
४. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये मुंबई या शब्दाऐवजी समाविष्ट करण्यात आले.
५. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० अन्वये पोट-कलम (३) मध्ये कोणताही बदल होणार नाही.
६. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ४ अन्वये हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
७. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ४ अन्वये अमलात येईल याऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply