महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १६७ :
निरसन व व्यावृत्ती (रद्द आणि बचाव) :
१) १.(अनुसूची १, भाग १ मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या) अधिनियमिती याद्वारे निरसित करण्यात येत आहेत:
परंतु,-
(एक) अशा कोणत्याही अधिनियमितीअन्वये विहित केलेले सर्व नियम, केलेल्या नेमणुका, प्रदान केलेल्या शक्ती, केलेले किंवा संमत केलेले आदेश, देण्यात आलेले निदेश आणि प्रमाणपत्रे, दिलेली संमती, परवाना परवानगी किंवा लायसेन्स, काढण्यात आलेली किंवा बजाविलेली आवाहनपत्रे किंवा अधिपत्रे, अटक केलेल्या किंवा स्थानबद्ध करुन ठेवलेल्या किंवा जामिनावर किंवा बंधपत्रावर सोडून दिलेल्या व्यक्ती, काढण्यात आलेली झडतीची अधिपत्रे, समपहरण केलेले बंधपत्र किंवा झालेली शास्ती ही जेथवर या अधिनियमाशी सुसंगत असेल तेथवर त्याअन्वये अनुक्रमे विहित करण्यात, देण्यात, संमत करण्यात, बजाविण्यात, अटक करण्यात, स्थानबद्ध करुन ठेवण्यात, सोडून देण्यात, समपहरण करण्यात आली आहेत व झाली आहेत, असे मानले जाईल.
(दोन) कोणत्याही मुंबई अधिनियमात, याद्वारे निरसित केलेल्या अधिनियमांपैकी कोणत्याही अधिनियमासंबंधीचे असलेले सर्व निर्देश हे जणू या अधिनियमाच्या तत्सम उपबंधासंबंधी केलेले निर्देश आहेत असे समजले जाईल.
२) पोटकलम (१) मधील कोणत्याही मजकुरामुळे पुढील गोष्टीस बाध येतो असे समजले जाणार नाही:-
अ) एखाद्या क्षेत्रात या अधिनियमाचे उपबंध ज्या तारखेस अमलात येतील त्या तारखेपूर्वी अशा क्षेत्रात केलेल्या किंवा करु दिलेल्या कोणत्याही कृत्याची वैधता, अवैधता किंवा परिणाम किंवा परिपाक ;
ब) अशा तारखेपूर्वी केलेल्या कोणत्याही कृत्याचे बाबतीत झालेली किंवा लादण्यात आलेली कोणतीही शास्ती, समपहरण किंवा शिक्षा;
क) अशा तारखेपूर्वी केलेल्या कोणत्याही कृत्याचे बाबतीत झालेली किंवा लादण्यात आलेली कोणतीही शास्ती, समपहरण किंवा शिक्षा;
ड) असा अधिकार, विशेषाधिकार, बंधन, जबाबदारी, शास्ती, समपहरण किंवा शिक्षा या संबंधिचे कोणतेही अन्वेषण, वैध कार्यवाही किंवा उपाययोजना;
इ) उपरोक्त तारखेस कोणत्याही न्यायालयात किंवा कोणत्याही अधिकाऱ्यापुढे अनिर्णित अवस्थेत असलेले कोणतेही वैध कार्यवाही किंवा अशी कार्यवाही चालू असताना केलेली किंवा करु दिलेली कोणतीही गोष्ट आणि अशा कार्यवाहीतून उद्भवलेली अशी कोणतीही कार्यवाही किंवा अपील किंवा पुनरीक्षणाची कार्यवाही ही, जणू हा अधिनियम अमलात आला नसल्याप्रमाणे यथास्थिती, दाखल करण्यात येईल, चालू राहील किंवा निकालात काढण्यात येईल.
२.(२अ) हा अधिनियम, मुंबई पोलीस (व्याप्ती वाढविणे व दुरुस्ती) अधिनियम, १९५१ अन्वये तो राज्याच्या ज्या भागास लागू करण्यात आला असेल त्या भागात अमलात आल्यावर, राज्याच्या त्या भागात अमलात असलेले अनुसूची १ च्या भाग २ मध्ये व अनुसूची ४ मध्ये विनिर्दिष्ट केलेले विधि(कायदे) निरसित होतील :
परंतु, अशा रीतीने अधिनियम निरसित केल्यामुळे पुढील गोष्टींना बाध येणार नाही:
अ) अशा रीतीने निरसित केलेल्या कोणत्याही विधीचे पूर्वप्रवर्तन किंवा तदन्वये योग्य रीतीने केलेली किंवा करु दिलेली कोणतीही गोष्ट ;किंवा
ब) अशा रीतीने निरसित केलेल्या कोणत्याही विधिअन्वये संपादन केलेला, उपार्जित झालेला किंवा पत्करलेला अधिकार, विशेषाधिकार, बंधन किंवा दायित्व; किंवा
क) अशा रीतीने निरसित केलेल्या कोणत्याही विधीविरुद्ध केलेल्या कोणत्याही गोष्टींच्या बाबतीत झालेली कोणतीही शास्ती;
आणि राज्याच्या संबंधित भागात हा अधिनियम अमलात आला नव्हता असे समजून कोणत्याही उपरोक्त हक्काच्या, विशेषधिकाराच्या, आबंधनाच्या, दायित्वाच्या किंवा शास्तीच्या बाबतीत कोणतेही अन्वेषण, वैध कार्यवाही किंवा उपाययोजना दाखल करता येईल, सुरु करता येईल किंवा अमलात आणता येईल व अशी कोणतीही शास्ती करता येईल:
परंतु आणखी असे की, पूर्ववर्ती परंतुकास अधीन राहून अशा कोणत्याही निरसित केलेल्या विधिअन्वये केलेली कोणतीही गोष्ट किंवा कोणतीही कृती (यामध्ये विहित केलेला कोणताही नियम, केलेली नेमणूक प्रदान केलेली शक्ती, संमत केलेली किंवा दिलेला आदेश, दिलेला निदेश किंवा दिलेले प्रमाणपत्र, दिलेली संमती, दिलेला परवाना, दिलेली परवानगी किंवा लायसेन्स, काढण्यात आलेले किंवा बजाविलेले समन्स किंवा अधिपत्र, अटक केलेली किंवा स्थानबद्ध केलेली किंवा जामीनावर किंवा बंधपत्रावर मुक्त केलेली व्यक्ती, दिलेले झडतीचे अधिपत्र किंवा समपहरण केलेले बंधपत्र यांचा समावेश होतो) या अधिनियमाशी विसंगत नसेल तेथवर, ज्यावेळी अशी गोष्ट करण्यात आली किंवा अशी कृती करण्यात आली त्यावेळी, राज्याच्या संबंधित भागात उक्त उपबंध अमलात होते असे समजून या अधिनियमाच्या तत्सम उपबंधान्वये केलेली आहे असे समजण्यात येईल आणि या अधिनियमान्वये केलेली कोणतीही गोेष्ट किंवा केलेली कोणतीही कृती या अन्वये तिचे अधिक्रमण होत नाही तोपर्यंत त्याप्रमाणे अमलात असण्याचे चालू राहील:
परंतू आणखी असे की, त्या त्यावेळी अमलात असलेल्या कोणत्याही विधीतील अशा कोणत्याही निरसित केलेल्या विधीचा किंवा त्याच्या कोणत्याही उपबंधाचा कोणताही निर्देश हा या अधिनियमाच्या किंवा त्याच्या तत्सम उपबंधांचा निर्देश आहे असा अर्थ लावण्यात येईल.)
*.३) अनुसूची ३ मध्ये विनिर्दिष्ट केलेली अधिनियमिती ही ३.(दुसऱ्या राज्यात घातलेले प्रदेश वगळून पुनर्रचनेपूर्वीच्या मुंबई राज्यास) लागू करताना अनुसूचीच्या स्तंभ (४) मध्ये विनिर्दिष्ट केलेल्या मर्यादेपर्यंत आणि अशा पद्धतीनुसार याद्वारे दुरुस्त करण्यात येत आहे.
———
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३४ (१) अन्वये अनुसूची १ मध्ये विनिर्दिष्ट केलेले या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३४ (२) अन्वये पोटकलम समाविष्ट करण्यात आले.
३. मुंबई विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९५६ अन्वये मुंबई राज्यास या मजकुराऐवजी हा मजकूर समाविष्ट करण्यात आला.
*. पोटकलम (३) मध्ये रुपभेद करण्यात आलेले नाहीत. महाराष्ट्र विधि अनुकूलन (राज्य व समवर्ती विषय) आदेश १९६० पहा.