महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १६२ :
लायसेन्स व लेखी परवानगी यात शर्ती नमूद करणे वगैरे व सही करणे :
१) या अधिनियमाच्या उपबंधान्वये मंजूर केलेल्या कोणत्याही लायसेन्सात किंवा लेखी परवानगीत, ज्या मुदतीसाठी व ज्या जागेसाठी देण्यात आली असेल ती मुदत व ती जागा आणि ज्या शर्तीच्या आणि निर्बंधाच्या अधीन राहून ती दिली असेल त्या शर्ती व निर्बंध विनिर्दिष्ट करण्यात येतील आणि असे लायसेन्स किंवा लेखी परवानगी, सक्षम अधिकाऱ्याच्या सहीने देण्यात येईल आणि त्याबाबतीत त्यासाठी या अधिनियमाखालील कोणत्याही नियमान्वये विहित करण्यात आली असेल अशी फी आकारण्यात येईल
लायसेन्स रद्द करणे :
२) या अधिनियमान्वये मंजूर केलेले कोणतेही लायसेन्स किंवा लेखी परवानगी जर तिच्या शर्ती किंवा निर्बंधांपैकी कोणत्याही शर्तीचा किंवा निर्बंधाचा, ती दिलेल्या व्यक्तीकडून भंग करण्यात आला असेल किंवा अशी शर्त किंवा निर्बंध टाळण्यात आला असेल किंवा अशा लायसेन्सचा किंवा परवानगीचा संंबंध असलेल्या कोणत्याही बाबतीमध्ये कोणत्याही अपराधाबद्दल अशा व्यक्तीस सिद्धापराधी असे ठरविण्यात आले असेल तर, सक्षम प्राधिकाऱ्याकडून कोणत्याही वेळी ती निलंबित करण्यात येईल किंवा रद्द करण्यात येईल.
लायसेन्स रद्द करण्यात येईल तेव्हा लायसनदार विनालायसन असेल :
३) जेव्हा असे कोणतेही लायसेन्स किंवा लेखी परवानगी निलंबित किंवा रद्द करण्यात व्यक्तीस ते लायसेन्स किंवा लेखी परवानगी मंजूर करण्यात आली होती ती व्यक्ती यथास्थिती, ते लायसेन्स किंवा ती परवानगी निलंबित किंवा रद्द करणारा आदेश रद्द करण्यात येईतोपर्यंत किंवा लायसेन्स किंवा ती परवानगी नवीन करण्यात येईतोपर्यंत लायसेन्स वाचून किंवा लेखी परवानगीवाचून आहे असे या अधिनियमाच्या सर्व प्रयोजनांसाठी समजण्यात येईल.
लायसेन्सदाराने आवश्यक तेव्हा लायसेन्स दाखविणे :
४) असे कोणतेही लायसेन्स किंवा लेखी परवानगी ज्या व्यक्तीस मंजूर करण्यात आली असेल अशी प्रत्येक व्यक्ती, लायसेन्स किंवा लेखी परवानगी अमलात असेल त्या मुदतीत सर्व वाजवी वेळी, पोलीस अधिकाऱ्याने तशी मागणी केल्यास असे लायसेन्स किंवा लेखी परवानगी सादर करील.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनाकरिता, ज्या व्यक्तीला लायसेन्स किंवा लेखी परवानगी मंजूर करण्यात आली असेल त्या व्यक्तीच्या वतीने काम करणाऱ्या नोकर किंवा अन्य अभिकर्ता याने केलेले असे कोणतेही उल्लंघन किंवा अशी टाळाटाळ किंवा त्यावर सिद्ध झालेला आरोप हा लायसेन्स किंवा लेखी परवानगी मंजूर करण्यात आलेल्या व्यक्तीने (शर्तीचे किंवा निर्बंधाचे) उल्लंघन किंवा टाळाटाळ केली आहे किंवा यथास्थिती त्याच्यावरील आरोप आहेत, असे समजण्यात येईल.