महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४२ :
१.(ज्या क्षेत्रातून निघून जाण्याबद्दल एखाद्या व्यक्तीस निर्देश देण्यात आला असेल त्या व्यक्तीने त्या क्षेत्रात परवानगीवाचून प्रवेश केल्याबद्दल किंवा तात्पुरत्या मुदतीकरिता परत येण्यास परवानगक्ष दिली असताना त्या मुदतीनंतरही तेथे राहण्याबद्दल २.(किंवा निवासस्थान किंवा निर्गमन किंवा आगमन यासंबंधी कळविण्यात कसूर केल्याबद्दल) शास्ती :
कलम ६२ अन्वये तरतूद केलेल्या परिस्थितीत आणि त्या रीतीने कोणत्याही व्यक्तीस अटक, करण्याच्या व काढून टाकण्याच्या शक्तीस हानी न पोहोचता, जी कोणीही व्यक्ती-
अ) कलमे ५५, ५६, ३.(५७, ५७अ किंवा ६३ अअ) अन्वये तीला दिलेल्या निदेशाचे उल्लंघन करुन, ज्या क्षेत्रातून किंवा कोणत्याही जिल्ह्यातून किंवा जिल्ह्यांमधून किंवा त्याच्या भागातून ४.(किंवा कोणत्याही विनिर्दिष्ट क्षेत्रातून किंवा क्षेत्रांमधून) तीला निघून जाण्याबाबत निदेश देण्यात आला होता, त्या क्षेत्रात किंवा त्या जिल्ह्यात किंवा जिल्ह्यांमध्ये किंवा त्याच्या भागात ४.(किंवा कोणत्याही विनिर्दिष्ट क्षेत्रातून किंवा क्षेत्रामध्ये) परवानगी घेतल्याशिवाय प्रवेश करील किंवा त्यात परत येईल तर;
ब) कलम ६२ पोटकलम (२) अन्वये दिलेल्या परवानगीनुसार या क्षेत्रात किंवा उपरोक्त जिल्ह्यात किंवा त्याच्या भागात ५.(किंवा कोणत्याही विनिर्दिष्ट क्षेत्रात किंवा क्षेत्रांमध्ये) प्रवेश करील किंवा त्यात परत येईल, परंतु त्या कलमाच्या उपबंधांच्या विरुद्ध वर्तन करुन, ज्या तात्पुरत्या मुदतीसाठी, प्रवेश करण्याची किंवा परत येण्याची परवानगी तीला देण्यात आली होती त्या मुदतीच्या समाप्तीनंतरही किंवा अशी परवानगी त्यापूर्वीच रद्द करण्यात आली असेल तर, ती रद्द करण्यात आल्यावर ६.(त्या क्षेत्रातून किंवा जिल्ह्यातून किंवा त्याच्या भागातून किंवा, यथास्थिती, अशा विनिर्दिष्ट क्षेत्रातून किंवा क्षेत्रांमधून) निघून जाण्यात कसूर करील किंवा अशा तात्पुरत्या मुदतीच्या समाप्तीनंतर किंवा परवानगी रद्द करण्यात आल्यावर त्या क्षेत्रातून स्वत: होऊन निघून जाऊन त्यानंतर पुन्हा परवानगी घेतल्याशिवाय तेथे प्रवेश करील किंवा परत येईल तर;
७.(क) कलम ५६ चे किंवा कलम ५७ चे पोटकलम (२) याअन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, आपल्या राहण्याचया ठिकाणाविषयी किंवा आपल्या जाण्याचा किंवा येण्याचा दिनांक कळविण्यात पुरेशा कारणाशिवाय कसूर करील तर)
त्या व्यक्तीस, अपराधसिद्धीनंतर, दोन वर्षेपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा होईल, परंतु अशी शिक्षा ही लेखी नमूद करावयाच्या कारणाखेरीज, सहा महिन्यांहून कमी असणार नाही आणि ती व्यक्ती द्रव्यदंड देण्याससुद्धा पात्र ठरेल.)
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम ४ अन्वये मूळ कलमाऐवजी हे कलम समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ८ (ड) अन्वये समासटीपेत हा मजकुर समाविष्ट करण्यात आले.
३. सन १९७६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १५ याच्या कलम ४, अनुसूची अन्वये ५७ किंवा ६३अअ या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ८ (अ) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
५. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ८ (ब) (एक) अन्वये हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.
६. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ८ (ब) (दोन) अन्वये त्या क्षेत्रातून निघून जाण्यात कसूर करील या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
७. सन १९८१ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३३ याच्या कलम ८ (क) अन्वये हा खंड समाविष्ट करण्यात आला.