Bnss कलम ३५५ : विवक्षित परिस्थितीत आरोपीच्या गैरहजेरीत चौकशी करण्याची तरतूद :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३५५ :
विवक्षित परिस्थितीत आरोपीच्या गैरहजेरीत चौकशी करण्याची तरतूद :
१) या संहितेखालील चौकशी किंवा संपरीक्षा कोणत्याही टप्प्याला असताना, न्यायहितार्थ न्यायालयात आरोपीची जातीनिशी हजेरी जरूरीची नाही किंवा आरोपी न्यायालयाच्या कामकाजात हेकेखोरपणाने अडथळे आणत आहे अशी काही कारणांस्तव न्यायाधीशाची किंवा दंडाधिकाऱ्याची खात्री होईल तेव्हा, ती कारणे नमूद करून तो न्यायाधीश किंवा दंडाधिकारी आरोपीचे प्रतिनिधित्व वकिलामार्फ त होत असेल तर, आरोपीला समक्ष हजर राहण्यापासून माफी देऊन त्याच्या अनुपस्थितीत अशी चौकशी किंवा संपरीक्षा पुढे चालू ठेवू शकेल आणि कार्यवाही नंतरच्या कोणत्याही टप्प्यात असताना अशा आरोपीने जातीने हजर व्हावे असे निदेशित करू शकेल.
२) जेव्हा अशा कोणत्याही खटल्यात आरोपीचे प्रतिनिधित्व वकिलामार्फ त होत नसेल अथवा न्यायाधीशाला किंवा दंडाधिकाऱ्याला आरोपीची जातीनिशी हजेरी जरूरीची वाटेल तेव्हा, त्याला योग्य वाटल्यास व कारणे नमूद करून, तो अशी चौकशी किंवा संपरीक्षा तहकूब करू शकेल अथवा अशा आरोपीचे प्रकरण वेगळे विचारात घ्यावे किंवा त्याची वेगळी संपरीक्षा करावी असा आदेश देऊ शकेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, आरोपीच्यां वैयक्तिक उपस्थितीमध्ये दृकश्राव्य (ऑडियो व्हिडियो) माध्यमातून उपस्थिती देखील समाविष्ट आहे.

Leave a Reply