भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ८५ :
फरारी व्यक्तीच्या मालमत्तेवर जप्ती आणणे :
१) कलम ८४ खाली उद्घोषणा काढणारे न्यायालय, उद्घोषणा काढल्यानंतर कोणत्याही वेळी कारणे लेखी नमूद करून, उद्घोषित व्यक्तींच्या जंगम किंवा स्थावर किंवा दोन्ही प्रकारच्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचा आदेश देऊ शकेल :
परंतु, ज्या व्यक्तीच्या संबंधात उद्घोषणा काढावयाची असेल ती व्यक्ती,-
(a) क) (अ) आपली संपूर्ण मालमत्ता किंवा तिचा कोणताही भाग यांची वासलात लावण्याच्या बेतात आहे, किंवा
(b) ख) (ब) न्यायालयाच्या स्थानिक अधिकारितेतून आपली संपूर्ण मालमत्ता किंवा तिचा कोणताही भाग हलवण्याच्या बेतात आहे,
अशी प्रतिज्ञालेखावरून किंवा अन्य प्रकारे न्यायालयाची उद्घोषणा काढण्याचे वेळी खात्री झाली तर, ते उद्घोषणा काढतानाच मालमत्तेचा जप्तीचा आदेश देऊ शकेल.
२) असा आदेश ज्या जिल्हात केला असेल तेथे अशा व्यक्तीची जी कोणतीही मालमत्ता असेल तिच्यावर जप्ती आणणे त्या आदेशाव्दारे प्राधिकृत होईल ; व अशा व्यक्तीची अशा जिल्ह्याबाहेर जी कोणतीही मालमत्ता असेल तिच्यावर, ज्याच्या जिल्ह्यात अशी मालमत्ता स्थित असेल त्या जिल्हा दंडाधिकाऱ्याने त्या आदेशावर पृष्ठांकन केले की जप्ती आणणे प्राधिकृत होईल.
३) जी मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देण्यात आला ती म्हणजे एखादे ऋण किंवा अन्य जंगम मालमत्ता असेल तर, या कलमाखालील जप्ती,
(a) क) (अ) अभिग्रहणाव्दारे; किंवा
(b) ख) (ब) प्रापकाच्या नियुक्तीव्दारे; किंवा
(c) ग) (क) उद्घोषित व्यक्तीकडे किंवा तिच्या वतीने कोणाकडेही अशी मालमत्ता सुपूर्द करण्यास मनाई करणाऱ्या लेखी आदेशाव्दारे; किंवा
(d) घ) (ड) न्यायालयास योग्य वाटेल त्यप्रमाणे अशा सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही दोन पध्दतींनी, केली जाईल.
४) ज्या मालमत्तेवर जप्ती आणण्याचा आदेश देण्यात आला ती स्थावर असेल तर, राज्य शासनाला महसूल देणाऱ्या जमिनीच्या बाबतीत, या कलमाखालील जप्ती ज्या जिल्ह्यात ती जमीन स्थित असेल त्याच्या जिल्हाधिकाऱ्यामार्फ त व अन्य सर्व बाबतीत,-
(a) क) (अ) कब्जा घेऊन; किंवा
(b) ख) (ब) प्रापकाच्या नियुक्तीव्दारे; किंवा
(c) ग) (क) उद्घोषित व्यक्तीकडे किंवा तिच्या वतीने कोणाकडेही भाडे भरण्यास किंवा मालमत्ता सुपूर्द करण्यास मनाई करणाऱ्या लेखी आदेशाव्दारे; किंवा
(d) घ) (ड) न्यायालयास योग्य वाटेल त्यप्रमाणे अशा सर्व किंवा त्यांपैकी कोणत्याही दोन पध्दतींनी केली जाईल.
५) जी मालमत्ता जप्त करण्याचा आदेश देण्यात आला ती जर पशुधनाच्या रूपातील किंवा जलद नाश पावणारी असेल तर न्यायालय, त्याला तसे समयोचित वाटले तर तिची तत्काळ विक्री करण्याचा आदेश देऊ शकेल व अशा बाबतीत, विक्रीचे उत्पन्न न्यायालयाच्या आदेशावर अवलंबून राहील.
६) या कलमाखाली नियुक्त केलेल्या प्रापकाचे अधिकार, कामे व दायित्वे दिवाणी प्रक्रिया संहिता, १९०८ (१९०८ चा ५ ) याखाली नियुक्त झालेल्या प्रापकाच्याप्रमाणेच असतील.