भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ६४ :
समन्स कसे बजाविले जाते :
१) प्रत्येक समन्स पोलीस अधिकाऱ्याकडून किंवा राज्य शासन यासंबंधात करील अशा नियमांच्या अधीनतेने, ते काढणाऱ्या न्यायालयाच्या अधिकाऱ्याकडून किंवा अन्य लोकसेवकाकडून बजावले जाईल :
परंतु पोलीस ठाणे किंवा रजिस्ट्रार न्यायालयात पत्ता, ई-मेल पत्ता, दूरध्वनी क्रमांक आणि अशा इतर तपशिलांच्या नोंदीसाठी, राज्य सरकार नियमांनुसार विहित करेल असे एक रजिस्टर ठेवेल.
२) ज्या व्यक्तीवर समन्स काढले आहे, त्या व्यक्तीला, शक्य तर, समन्सच्या दोन प्रतिलिप्यांपैकी एक प्रतिलिपी सुपूर्द करून किंवा देऊ करून खुद्द त्या व्यक्तीवर समन्स बजावण्यात येईल :
परंतु न्यायालयाचा शिक्का असलेले समन्स अशा स्वरुपात अशा पद्धतीने, जे राज्य सरकार नियमांद्वारे उपबंधित करेल, इलैक्ट्रॉनिक संप्रेषणाद्वारे बजावले जाऊ शकेल.
३) जिच्यावर याप्रमाणे समन्स बजावण्यात आले असेल अशा प्रत्येक व्यक्तीला, बजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याने खुद्द तशी मागणी केल्यास, अन्य प्रतिलिपीच्या मागील बाजूस त्याबद्दलची पोच म्हणून स्वाक्षरी करावी लागेल.