भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४२६ :
विना सोपस्कार खारीज न केलेल्या अपिलांच्या सुनावणीची प्रक्रिया :
१) जर अपील न्यायालयाने अपील विनासोपस्कार खारीज केले नाही तर, ते न्यायालय –
एक) अपीलकर्त्याला किंवा त्याच्या वकिलाला;
दोन) राज्य शासन यासंबंधात नियुक्त करील अशा अधिकाऱ्याला;
तीन) फिर्यादीवरून सुरू केलेल्या खटल्यातील दोषसिध्दीच्या न्यायनिर्णयावर अपील केलेले असेल तर फिर्याददाराला;
चार) जर कलम ४१८ किंवा कलम ४१९ खाली अपील केलेले असेल तर आरोपीला, कोणत्या वेळी व स्थळी अशा अपिलाची सुनावणी होईल याबद्दलची नोटीस देववील व अशा अधिकाऱ्याला, फिर्याददाराला किंवा आरोपीला अपिलाच्या कारणांची प्रतही पुरवील.
२) नंतर अपील न्यायालयात त्या खटल्याचा अभिलेख त्या वेळी उपलब्ध नसेल तर, ते न्यायालय असा अभिलेख मागवील व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेईल.
परंतु, जर अपील फक्त शिक्षेच्या व्याप्तीविषयी किंवा वैधतेविषयीच असेल तर, न्यायालयाला अभिलेख न मागविताही अपिलाचा निकाल करता येईल.
३) जेथे दोषसिध्दीवर अपील करण्यास अपीलकर्त्याच्या म्हणण्याप्रमाणे कडक शिक्षा हेच फक्त कारण असेल तर, अन्य कोणत्याही कारणाच्या पुष्ट्यर्थ न्यायालयाच्या अनुज्ञेखेरीज त्याला आपले म्हणणे पुढे मांडता येणार नाही किंवा ते ऐकून घेतले जाणार नाही.