भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४१९ :
दोषमुक्तीच्या बाबतीत अपील :
१) पोटकलम (२) मध्ये तरतूद करण्यात आली आहे ते खेरीज करून आणि पोटकलमे (३) व (५) च्या तरतुदींना अधीन राहून,-
(a) क) (अ) जिल्हा दंडाधिकारी, कोणत्याही प्रकरणात, सरकारी अभियोक्त्याला एखाद्या दंडाधिकाऱ्याने दखली व बिनदखली अपराधाच्या बाबतीत दिलेल्या दोषमुक्तीच्या आदेशाविरूध्द सत्र न्यायालयात अपील सादर करण्याचा निदेश देऊ शकेल;
(b) ख) (ब) राज्यशासन, कोणत्याही प्रकरणात, सरकारी अभियोकत्याला, उच्च न्यायालयाखेरीज इतर कोणत्याही न्यायालयाने काढलेल्या दोषमुक्तीच्या मूळ किंवा अपील आदेशाविरूध्द (खंड (a)(क) खालील आदेश नसलेल्या) किंवा सत्र न्यायालयाने काढलेल्या पुनरीक्षण आदेशाविरूध्द उच्च न्यायालयाकडे अपील सादर करण्याचा निदेश देऊ शकेल.
२) या संहितेहून अन्य कोणत्याही केंद्रीय अधिनियमाखाली अपराधाचे अन्वेषण करण्याचा अधिकार प्रदान झालेल्या कोणत्याही यंत्रणेने अपराधाचे अन्वेषण केलेले आहे अशा खटल्यात असा दोषमुक्तीचा आदेश दिलेला असेल तर, केंद्रशासन, पोटकलम (३) च्या तरतुदींना अधीन राहून सरकारी अभियोक्त्याला-
(a) क) (अ) दखली आणि बिनदखली अपराधाच्या संबंधात दंडाधिकाऱ्याने दिलेल्या दोषमुक्तीच्या आदेशाविरूध्द सत्र न्यायालयाकडे;
(b) ख) (ब) उच्च न्यायालयाखेरीज इतर कोणत्याही न्यायालयाने काढलेल्या दोषमुक्तीच्या मूळ किंवा अपील आदेशाविरूध्द (खंड- (a)क) (अ)) खालील आदेश नसलेल्या किंवा सत्र न्यायालयाने काढलेल्या पुनरीक्षण आदेशाविरूध्द उच्च न्यायालयाकडे,
अपील सादर करण्याचा निदेश देऊ शकेल.
३) पोटकलम (१)किंवा पोटकलम (२)खालील उच्च न्यायालयाकडे करण्यात आलेले कोणतेही अपील उच्च न्यायालयाच्या परवानगीशिवाय विचारार्थ स्वीकारण्यात येणार नाही.
४) जर दिलेल्या फिर्यादीवरून सुरू केलेल्या कोणत्याही खटल्यात असा दोषमुक्तीचा आदेश देण्यात आला आणि फिर्याददाराने उच्च न्यायालयाकडे अर्ज केल्यावर त्याने दोषमुक्तीच्या आदेशावर अपील करण्यास विशेष अनुज्ञा दिली गेली तर, फिर्याददाराला उच्च न्यायालयाकडे असे अपील सादर करता येईल.
५) दोषमुक्तीच्या आदेशावर अपील करण्यास विशेष अनुज्ञा मिळण्यासाठी पोटकलम (४)खाली केलेला अर्ज, दोषमुक्तीच्या त्या आदेशाच्या दिनांकापासून गणना करता फिर्याददार हा लोकसेवक असल्यास त्याच्या बाबतीत सहा महिने व अन्य प्रत्येक बाबतीत साठ दिवस संपल्यानंतर उच्च न्यायालय विचारार्थ स्वीकारणार नाही.
६) जर कोणत्याही खटल्यात, दोषमुक्तीच्या आदेशावर अपील करण्यास विशेष अनुज्ञा मिळण्यासाठी पोटकलम (४) खाली केलेला अर्ज नाकारला गेला तर, दोषमुक्तीच्या त्या आदेशावर पोटकलम (१) खाली किंवा पोटकलम (२) खाली अपील होऊ शकणार नाही.