भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४० :
खाजगी व्यक्तीकडून अटक आणि नंतरची प्रक्रिया :
१) कोणतीही खाजगी व्यक्ती, तिच्या समक्ष ज्याने बिनजामिनी आणि दखलपात्र अपराध केला असेल अशा कोणत्याही इसमास किंवा कोणत्याही उद्घोषित अपराध्यास अटक करु शकेल किंवा अटक करवू शकेल आणि, अनावश्यक विलंब न लावता, सहा तासाच्या आत, याप्रमाणे अटक केलेल्या इसमाला पोलीस अधिकाऱ्याच्या स्वाधीन करील किंवा स्वाधीन करवील अथवा, पोलीस अधिकारी अनुपस्थित असल्यास अशा इसमाला बंदोबस्तात सर्वांत जवळच्या पोलीस ठाण्यावर नेईल किंवा नेववील.
२) जर असा इसम कलम ३५ च्या पोटकलम (१) च्या उपबंधाखाली येतो असे समजण्यास कारण असेल तर, पोलीस अधिकारी त्याला ताब्यात घेईल.
३) जर त्याने बिनदखली अपराध केलेला आहे असे समजण्यास कारण असेल आणि पोलीस अधिकाऱ्याने मागणी केली असता त्याने आपले नाव व राहण्याचे ठिकाण सांगऱ्यास नकार दिल अथवा जे खोट आहे असे समजण्यास अशा अधिकाऱ्याला कारण आहे असे नाव किंवा राहण्याचे ठिकाण सांगितले तर, त्याच्याबाबत कलम ३९ च्या उपबंधाखाली कार्यवाही केली जाईल; पण त्याने कोणताही अपराध केला आहे असे समजण्यास कोणतेही पुरेसे कारण नसेल तर, त्याला लगेच सोडून देण्यात येईल.