भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३९४ :
पूर्वी सिद्धदोष ठरवलेल्या अपराध्याचा पत्ता कळविण्याचा आदेश :
१) तीन वर्षे किवां त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल भारतातील कोणत्याही न्यायालयाने एखाद्या व्यक्तीला सिध्ददोष ठरवलेले असून, द्वितीय वर्ग दंडाधिकाऱ्याच्या न्यायालयाहून अन्य कोणत्याही न्यायालयाने तीन वर्षे किंवा त्याहून अधिक मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल पुन्हा दोषी ठरविले असेल तेव्हा, असे न्यायालय त्याला योग्य वाटल्यास,अशा व्यक्तीला कारावासाची शिक्षा देताना अशी शिक्षा संपण्याच्या दिनांकापासून जास्तीत जास्त पाच वर्षे इतक्या मुदतीपर्यंत तिने बंधमुक्ततेनंतरचे आपले राहण्याचे ठिकाण आणि अशा राहण्याच्या ठिकाणाचा बदल किंवा त्यातील अनुपस्थिती या गोष्टी यात यापुढे उपबंधित केलेल्या रीतीने कळवल्या पाहिजत असाही आदेश देऊ शकेल.
२) पोटकलम (१) चे उपबंध, असे अपराध करण्यासाठी केलेल्या फौजदारीपात्र कटांना आणि अशा अपराधांच्या आणि ते अपराध करण्याच्या प्रयत्नांच्या अपप्रेरणासही लागू आहेत.
३) अपिलांती किंवा अन्यथा अशी दोषसिध्दी ठरविली असेल तर, असा आदेश शून्य होईल.
४) या कलमाखालील आदेश अपील न्यायालय अथवा आपले पुनरीक्षणाचे अधिकार वापरणारे उच्च न्यायालय किंवा सत्र न्यायालय काढू शकेल.
५) बंधमुक्त सिध्ददोष अपराध्यांनी राहण्याचे ठिकाण किंवा राहण्याच्या ठिकाणाचा बदल किंवा त्यातील अनुपस्थिती कळवण्यासंबंधी या कलमात असलेल्या उपबंधांची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाला अधिसुचनेद्वारे नियम करता येतील.
६) अशा नियमांमध्ये त्यांच्या भंगाबद्दल शिक्षेचा उपबंध करता येईल आणि अशा कोणत्याही नियमांचा भंग केल्याचा दोषारोप ठेवण्यात आलेल्या कोणत्याही व्यक्तीची, तिने त्याच्या निकटपूर्वी आपले राहण्याचे ठिकाण म्हणून कळवलेले ठिकाण ज्या जिल्ह्यात स्थित असेल तेथील सक्षम अधिकारितेच्या दंडधिकाऱ्याला संपरीक्षा करता येईल.