भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३९३ :
न्यायनिर्णयाची भाषा व मजकूर :
१) या संहितेव्दारे अन्यथा उपबंधित केले असेल ते खेरीजकरून एरव्ही, कलम ३९२ मध्ये ज्या न्यायनिर्णयाचा निर्देश केला आहे –
(a) क) (अ) असा प्रत्येक न्यायनिर्णय न्यायालयाच्या भाषेत लिहिला जाईल:
(b) ख) (ब) त्यात निर्णीत करावयाचा मुद्दा किंवा मुद्दे, त्यावरील निर्णय आणि निर्णयाची कारणे अंतर्भुत असतील;
(c) ग) (क) त्यात, अपराध घडला असल्यास कोणत्या अपराधाबद्दल आणि भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या किंवा अन्य कायद्याच्या कोणत्या कलमाखाली आरोपीला सिध्ददोष ठरवलेले आहे व त्याला कोणती शिक्षा देण्यात आली आहे ते विनिर्दिष्ट केले जाईल;
(d) घ) (ड) तो दोषमुक्तीचा न्यायनिर्णय असेल तर, आरोपीला कोमत्या अपराधाबाबत दोषमुक्त करण्यात आले आहे ते त्यात नमूद केले जाईल आणि त्याला मुक्त करण्यात यावे असे त्याव्दारे निदेशित केले जाईल.
२) भारतीय न्याय संहिता २०२३ याखाली दोषसिध्दी करण्यात आली असेल आणि त्या संहितेच्या दोहोंपैकी कोणत्या कलमाखाली किंवा एकाच कलमाच्या दोहोंपैकी कोणत्या भागाखाली अपराध येतो याबाबत शंका असेल तेव्हा, न्यायालय त्याचा पृथक्पणे उल्लेख करील आणि वैकल्पिक न्यायनिर्णय देईल.
३) जेव्हा मृत्यूच्या किंवा पर्याय म्हणून आजीव कारावासाच्या किंवा काही वर्षे मुदतीच्या कारावासाच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल दोषसिध्दी झाली असेल तेव्हा देण्यात आलेल्या शिक्षेची कारणे, आणि मृत्यूच्या शिक्षेच्या बाबतीत, अशा शिक्षेची विशेष कारणे न्यायनिर्णयात नमूद केली जातील.
४) जेव्हा एक वर्ष किंवा त्याहून अधिक मुदतीच्या शिक्षेस पात्र असलेल्या अपराधाबद्दल दोषसिध्दी झाली असली तरी न्यायालयाने तीन महिन्यांहून कमी मुदतीची शिक्षा दिलेली असेल तेव्हा, न्यायालय उठेपर्यंत कैद अशी ती शिक्षा असल्यास ती बाब किंवा या संहितेच्या उपबंधांखाली त्या खटल्याची संक्षिप्त संपरीक्षा झाली असल्यास ती बाब खेरीजकरून एरव्ही, अशी शिक्षा देण्यामागची आपली कारणे ते नमूद करील.
५) जेव्हा कोणत्याही व्यक्तीला मृत्यूची शिक्षा देण्यात येईल तेव्हा, त्याला गळ्याला फास लावून मरेपर्यंत फासावर लटकवावे असे शिक्षादेशात निदेशित केले जाईल.
६) कलम १३६ खालील किंवा कलम १५७ च्या पोटकलम (२) खालील प्रत्येक आदेश आणि कलम १४४ ,कलम १६४ किंवा कलम १६६ खाली दिलेला प्रत्येक अंतिम आदेश यामध्ये, निर्णीत करावयाचा मुद्दा किंवा मुद्दे, निर्णय आणि निर्णयाची कारणे अंतर्भुत असतील.