भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३६४ :
पुरेशी कडक शिक्षा देणे शक्य नसते तेव्हाची प्रक्रिया :
१) जेव्हा केव्हा फिर्यादी पक्षाचा व आरोपीचा साक्षीपुरावा ऐकल्यानंतर, आरोपी दोेषी आहे, व जी शिक्षा देण्याचा आपणांस अधिकार आहे त्याहून निराळ्या प्रकारची किंवा त्याहून कडक शिक्षा आरोपीला मिळावयास पाहिजे असे दंडाधिकाऱ्याचे मत होईल किंवा तोद्वितीय वर्ग दंडाधिकारी असल्यास, कलम १२५ खाली आरोपीला बंधपत्र किंवा जामीनपत्र करून देण्यास फर्माविले पाहिजे असे त्या दंडाधिकाऱ्याचे मत होईल तेव्हा, तो आपले मत नमूद करू शकेल आणि तो ज्याला दुय्यम असेल त्या मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याकडे आपल्याकडील कार्यवाही सादर करून आरोपीला त्याच्याकडे पाठवू शकेल.
२) जेव्हा एकाहून अधिक आरोपी व्यक्तींची एकत्रितपणे संपरीक्षा होत असेल व अशा आरोपींपैकी कोणाच्याही बाबत पोटकलम (१) खाली कार्यवाही करणे दंडाधिकाऱ्याला जरूरीचे वाटेल तेव्हा, जे त्याच्या मते दोषी असतील असा सर्व आरोपींना तो मुख्य न्याय दंडाधिकाऱ्याकडे पाठवील.
३) ज्याच्याकडे कार्यवाही सादर केलेली असेल तो मुख्य न्यायदंडाधिकारी, स्वत:ला योग्य वाटले तर, पक्षकारांची साक्ष तपासणी करू शकेल व ज्या कोणत्याही साक्षीदाराने आधीच साक्ष दिली असेल त्याला पुन्हा बोलावून साक्षतपासणी करू शकेल आणि आणखी साक्षी पुरावा मागवू व घेऊ शकेल, व त्या खटल्यात स्वत:ला योग्य वाटेल तसा व कायद्यानुसार असेल तसा न्यायनिर्णय, शिक्षादेश किंवा आदेश देईल.