Bnss कलम ३४६ : कार्यवाही पुढे ढकलणे: तहकूब करण्याचा अधिकार :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३४६ :
कार्यवाही पुढे ढकलणे: तहकूब करण्याचा अधिकार :
१) प्रत्येक चौकशीत किंवा न्यायचौकशीत, उपस्थित असलेल्या सर्व साक्षीदारांची तपासणी पूर्ण होईपर्यंत ती कार्यवाही रोजच्या रोज चालू ठेवण्यात येईल. मात्र, लगत पुढील दिवसापेक्षा अधिक काळ ती तहकूब करणे न्यायालयाला नमूद केलेल्या कारणासाठी आवश्यक वाटेल तर ती बाब वगळून असे करण्यात येईल :
परंतु असे की, चौकशी किंवा न्यायचौकशी भारतीय न्याय संहिता २०२३ कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ७० किंवा कलम ७१ खालील अपराधांच्या संबंधात असेल तर, अशी चौकशी किंवा न्यायचौकशी ही दोषारोपत्र दाखल करण्यात आल्याच्या तारखेपासून दोन महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करण्यात आली पाहिजे.
२) अपराधाची दखल घेतल्यानंतर, किंवा संपरीक्षा सुरू झाल्यानंतर कोणत्याही चौकशीची सुरूवात पुढे ढकलणे किंवा संपरीक्षा तहकूब करणे काही कारणास्तव आवश्यक किंवा उचित असल्याचे न्यायालयाला दिसून आले तर, कारणे नमूद करून ते वेळोवेळी त्याला योग्य वाटतील अशा अटींवर, त्याला वाजवी वाटेल अशा अवधीकरता, ती पुढे ढकलू शकेल किंवा तहकूब करू शकेल, आणि आरोपी हवालतीत असेल तर, त्याला वॉरंटाद्वारे तेथे परत पाठवले जाईल :
परंतु, न्यायालय या कलमाखाली आरोपी व्यक्तीला एका वेळी पंधरा दिवसांहून अधिक अवधीकरता हवालतीत परत पाठवणार नाही :
परंतु आणखी असे की, साक्षीदार हजर असतील तेव्हा, त्यांना तपासल्याशिवाय चौकशी किंवा संपरीक्षा तहकूब करण्यास किंवा पुढे ढकलण्यास मान्यता दिली जाणार नाही- मात्र विशेष कारणांस्तव तसे न केल्यास कारणे नमूद करावी लागतील :
परंतु आणखी असे की, आरोपी व्यक्तीला देण्याचे योजलेल्या शिक्षेविरूध्द कारण दाखवणे तिला शक्य व्हावे एवढयाच केवळ प्रयोजनासाठी संपरीक्षा किंवा चौकशी तहकबू करण्यास मान्यता दिली जाणार नाही :
परंतु तसेच-
(a) क) (अ) जेव्हा परिस्थिती त्या पक्षकाराच्या नियंत्रणाबाहेर असेल त्याखेरीज, पक्षकाराच्या विनंतीवरून कोणतीही तहकूबी दिली जाणार नाही;
(b) ख) (ब) जिथे परिस्थिती पक्षाच्या नियंत्रणाबाहेर असेल, तिथे न्यायालय इतर पक्षांचे आक्षेप ऐकल्यानंतर आणि नोंदवल्या जाणाऱ्या कारणांसाठी दोनपेक्षा जास्त स्थगिती देऊ शकत नाही;
(c) ग) (क) एखाद्या पक्षकाराचा वकील दुसऱ्या न्यायालयाच्या कामात गुंतलेला आहे ही वस्तुस्थिती, तहकुबीचे कारण असणार नाही;
(d) घ) (ड) जेव्हा साक्षीदार न्यायलयात उपस्थित असेल; परंतु पक्षकार किंवा त्याचा वकील उपस्थित नसेल अथवा पक्षकार किंवा त्याचा वकील न्यायालयात उपस्थित असला तरी, ते साक्षीदारांची तपासणी किंवा उलट-तपासणी करण्यास तयार नसतील तर, न्यायालय त्याला जर तसे योग्य वाटल्यास, साक्षीदारांचे जबाब नोंदवून घेऊ शकेल आणि परत तपासणी किंवा यथास्थिती उलट तपासणीशिवाय भागवून, त्याला योग्य वाटेल असा आदेश संमत करू शकेल.
स्पष्टीकरण १ :
आरोपीने अपराध केला असावा असा संशय घेण्यास पुरेसा पुरावा मिळालेला असेल आणि हवालतीत परत पाठवण्याने आणखी पुरावा मिळण्याचा संभव आहे असे दिसत असेल तर, हवालतीत परत पाठवण्यास ते वाजवी कारण होऊ शकेल.
स्पष्टीकरण २:
याप्रमाणे चौकशी किंवा संपरीक्षा तहकूब करण्यास किंवा पुढे ढकलण्यास ज्या अटींवर मान्यता दिली जाईल त्यामध्ये, योग्य प्रसंगी फिर्यादी पक्षाने किंवा आरोपीने खर्च देण्याच्या अटीचा समावेश आहे.

Leave a Reply