भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २६२ :
आरोपीला केव्हा बिनादोषारोप सोडले जाईल :
१) कलम २३० खाली दस्तावेजांच्या प्रति दिल्याच्या तारखेपासून साठ दिवसांच्या आत आरोपी सुटकेसाठी अर्ज करु शकेल.
२) जर कलम १९३ खालील पोलीस अहवाल व त्याबरोबर पाठवलेले कागदपत्र यांचा विचार केल्यावर आणि दंडाधिकाऱ्यास जरूर वाटेल तर व तेवढी आरोपीची, एक तर शारीरिक रित्या किंवा श्रव्य-दृश्य इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे, तपासणी केल्यावर आणि फिर्यादीपक्षाला व आरोपीला आपले म्हणणे मांडण्याची संधी दिल्यावर, जर दंडाधिकाऱ्यास आरोपीविरूध्द केलेला आरोप निराधार वाटला तर तो आरोपीला विनादोषारोप सोडील, आणि तसे करण्याची आपली कारणे नमूद करील.