Bnss कलम २३३ : एकाच अपराधाबद्दल खासगी फिर्याद असेल आणि पोलीस तपास चालू असेल तर तेव्हा अनुसरायची कार्यपद्धती :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २३३ :
एकाच अपराधाबद्दल खासगी फिर्याद असेल आणि पोलीस तपास चालू असेल तर तेव्हा अनुसरायची कार्यपद्धती :
१) पोलीस अहवालाव्यतिरिक्त अन्य प्रकारे गुदरलेल्या खटल्यात (यात यापुढे फिर्यादजन्य खटला म्हणून निर्दिष्ट), आपण चालवलेल्या चौकशीच्या किंवा संपरीक्षेच्या ओघात जर दंडाधिकाऱ्याच्या असे निदर्शनास आणून देण्यात आले की, त्याने चालवलेल्या चौकशीचा किंवा संपरीक्षेचा विषय असलेल्या अपराधाच्या संबंधात पोलीस अधिकाऱ्याकडून अन्वेषण चालू आहे, तर तो दंडाधिकारी अशा चौकशीचे किंवा संपरीक्षेचे कामकाज स्थगित करील आणि अन्वेषण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याकडून त्या बाबीवरील अहवाल मागवील.
२) जर कलम १९३ खाली अन्वेषण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने अहवाल दिला आणि फिर्यादजन्य खटल्यात आरोपी असलेल्या कोणत्याही व्यक्तीविरूध्द दंडाधिकाऱ्याने अशा अहवालावरून कोणत्याही अपराधाची दखल घेतली तर, फिर्यादजन्य खटला व पोलीस अहवालातून उभ्दवणारा खटला हे दोन्हींची एकत्रितपणे चौकशी किंवा संपरिक्षा करील.
३) जर पोलीस अहवाल हा फिर्यादजन्य खटल्यातील कोणत्याही आरोपीशी संबंधित नसेल किंवा पोलीस अहवालावरून दंडाधिकाऱ्याने कोणत्याही अपराधाची दखल घेतली नसेल तर, तो आपण स्थगित केलेली चौकशी किंवा संपरीक्षा या संहितेच्या उपबंधांनुसार पुढे चालवील.

Leave a Reply