Bnss कलम २०१ : विवक्षित अपराधांचे बाबतीत संपरीक्षेचे स्थळ :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम २०१ :
विवक्षित अपराधांचे बाबतीत संपरीक्षेचे स्थळ :
१) दरवडा घालणे, खुनासह दरवडा घालणे, दरोडेखोरांच्या टोळीपैकी असणे किंवा हवालतीतून निसटणे अशा कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा ज्याच्या स्थानिक अधिकारितेत अपराध करण्यात आला असेल किंवा अरोपी सापडला असेल त्या न्यायालयाला करता येईल.
२) व्यक्तीचे अपनयन किंवा अपहरण करण्याच्या कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा ज्याच्या स्थानिक अधिकारितेत व्यक्तीचे अपनयन किंवा अपरहण घडले किंवा तिला वाहनातून नेण्यात आले किंवा लपवण्यात आले किंवा स्थानबद्ध करण्यात आले त्या न्यायालयाला करता येईल.
३) चोरी, बलाद्ग्रहण किंवा लूटमारी अशा कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा ज्या न्यायालयाच्या स्थानिक अधिकारितेत तो अपराध घडला किंवा अपराधाविषय असलेली चोरीची मालमत्ता तो अपराध करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात अथवा जी चोरीची मालमत्ता असल्याचे माहीत असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना ज्या कोणत्याही व्यक्तीने अशी मालमत्ता स्वीकारली किंवा ठेवून घेतली तिच्या कब्जात असेल त्या न्यायालयाला करता येईल.
४) फौजदारीपात्र अपहाराच्या किंवा फौजदारीपात्र न्यासभंगाच्या कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा ज्याच्या स्थानिक अधिकारितेत अपराध घडला अथवा अपराधाविषय असलेल्या मालमत्तेचा कोणताही भाग आरोपी व्यक्तीने स्वीकारला किंवा ठेवून घेतला अथवा तो परत केला जाण्याची किंवा त्याचा हिशेब दिला जाण्याची तिने मागणी केली त्या न्यायालयाला करता येईल.
५) चोरीची मालमत्ता कब्जात ठेवणे हे ज्यात समाविष्ट असेल अशा कोणत्याही अपराधाची चौकशी किंवा संपरीक्षा, ज्याच्या स्थानिक अधिकारितेत अपराध घडला किंवा ती चोरीची मालमत्ता असल्याचे माहीत असताना किंवा तसे समजण्यास कारण असताना ज्या कोणत्याही व्यक्तीने ती स्वीकारली किंवा ठेवून घेतली त्या न्यायालयाला करता येईल.

Leave a Reply