भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १८४ :
बलात्कार झालेल्या व्यक्तीची वैद्यकीय तपासणी :
१) बलात्कार केल्याच्या किंवा बलात्कार करण्याचा प्रयत्न केल्याच्या अपराधाचे अन्वेषण चालू असेल अशा टप्प्यात, ज्या महिलेवर बलात्कार केल्याचा किंवा करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला असेल किंवा तसा प्रयत्न झाला असेल अशा महिलेच्या शरीराची वैद्यकीय तज्ज्ञांकडून तपासणी करून घेण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे, अशी तपासणी, शासनाकडून किंवा स्थानिक प्राधिकरणाकडून चालविण्यात येणाऱ्या रूग्णालयात नेमण्यात आलेल्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीकडून करण्यात येईल आणि असा वैद्यक व्यवसायी नसेल तर, अशा महिलेच्या संमतीने किंवा तिच्या व तिने अशी संमती देण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीच्या संमतीने इतर कोणत्याही नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीकडून अशी तपासणी करण्यात येईल, आणि अशा महिलेला, असा अपराध घडल्याची माहिती मिळाल्यापासून चोवीस तासांच्या आत वैद्यक व्यवसायीकडे पाठविण्यात येईल.
२) ज्या नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीकडे त्या महिलेला पाठविण्यात येईल त्याने विनाविलंब तिच्या शरीराची तपासणी केली पाहिजे आणि आपल्या तपासणीचा पुढील तपशील देणारा अहवाल तयार केला पाहिजे:-
एक) त्या महिलेचे आणि ज्या व्यक्तीने तिला आणले असेल त्या व्यक्तीचे नाव आणि पत्ता;
दोन) त्या महिलेचे वय;
तीन) डीएनए प्रोफायqलग साठी त्या महिलेच्या शरीरावरून घेतलेल्या द्रव्याचे वर्णन;
चार) त्या महिलेच्या शरीरावरील जखमेच्या खुणा, असल्यास;
पाच) त्या महिलेची सर्वसाधारण मानसिक अवस्था;
सहा) इतर महत्त्वाचे तपशील वाजवी तपशिलात.
३) अहवालामध्ये; काढलेल्या निष्कर्षाची कारणे तंतोतंत नमूद करण्यात आली पाहिजेत.
४) त्या महिलेची किंवा तिच्यावतीने अशी संमती देण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीची अशा तपासणीसाठी संमती घेण्यात आली होती हे अहवालामध्ये विनिर्दिष्टपणे नमूद करण्यात आले पाहिजे.
५) तपासणी सुरू केल्याची आणि संपल्याची अचूक वेळ सुद्धा अहवालात नमूद केली पाहिजे.
६) नोंदणीकृत वैद्यक व्यवसायीने तो अहवाल, सात दिवसांच्या कालावधीच्या आत, अन्वेषण अधिकाऱ्याकडे पाठवला पाहिजे आणि त्याने तो कलम १९३ मध्ये निर्दिष्ट करण्यात आलेल्या दंडाधिकाऱ्याकडे, त्या कलमाच्या पोटकलम (६) च्या खंड (a) (क) मध्ये निर्दिष्ट केलेले दस्तऐवज म्हणून अग्रेषित केला पाहिजे.
७) या कलामतील कोणत्याही गोष्टीमुळे महिलेच्या किंवा तिच्यावतीने संमती देण्यास सक्षम असलेल्या व्यक्तीच्या संमतीविना केलेली तपासणी कायदेशीर ठरते असा अर्थ लावण्यात येणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, तपासणी आणि नोंदणीकृत वैद्यक व्यवसायी या संज्ञांना, त्यांना अनुक्रमे कलम ५१ मध्ये दिलेले तेच अर्थ असेल.