Bnss कलम १८० : पोलिसांनी घ्यावयाची साक्षीदाराची तपासणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १८० :
पोलिसांनी घ्यावयाची साक्षीदाराची तपासणी :
१) या प्रकरणाखाली अन्वेषण करणाऱ्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला अथवा राज्य शासन या संबंधात सर्वसाधारण किंवा विशेष आदेशाद्वारे विहित करील अशा दर्जाहून खालचा दर्जा नसलेला जो कोणताही पोलीस अधिकारी अशा अधिकाऱ्याच्या फर्मानानुसार कार्य करीत असेल अशा कोणत्याही अधिकाऱ्याला प्रकरणाच्या तथ्यांशी व परिस्थितीशी परिचित असल्याचे समजल्या गेलेल्या कोणत्याही व्यक्तीची तोंडी साक्षतपासणी घेता येईल.
२) अशा अधिकाऱ्याने अशा प्रकरणासंबंधी त्या व्यक्तीला विचारलेल्या प्रशनांपैकी ज्यांच्या उत्तरांमुळे ती फौजदारीपात्र आरोपास, दंडास किंवा समपहरणास पात्र होण्याची शक्यता आहे त्याहून अन्य सर्व प्रश्नांची खरीखुरी उत्तरे देण्यास ती बांधलेली असेल.
३) पोलीस अधिकारी या कलमाखालील साक्षतपासणीच्या ओघात त्याला दिलेला जबाब लेखनिविष्ट करू शकेल; आणि जर त्याने असे केले तर, ज्या ज्या व्यक्तीचा जबाब तो नमूद करीत असेल अशा प्रत्येक व्यक्तीच्या जबाबाचा वेगवेगळा व यथातथ्य अभिलेख तो तयार करील.
परंतु, या पोटकलमान्वये घेतलेला जबाब, दृक-श्राव्य इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे देखील नोंदविता येईल :
परंतु आणखी असे की, भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ६९, कलम ७०, कलम ७१, कलम ७४, कलम ७५, कलम ७६, कलम ७७, कलम ७८ किंवा कलम १२४ खालील अपराध किंवा अपराधाचा प्रयत्न तिच्या बाबतीत करण्यात आला असल्याचे कथित असेल अशा स्त्रीचा जबाब महिला पोलीस अधिकारी किंवा कोणतीही महिला अधिकारी लेखनिविष्ट करील.

Leave a Reply