भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम १४० :
जामीनदार नाकारण्याचा अधिकार :
१) या प्रकरणाखाली एखादा जामीनदार देऊ करण्यात आलेला असता, जामीनपत्राच्या प्रयोजनांसाठी असा जामीनदार ही अयोग्य व्यक्ती आहे या कारणावरून तो स्वीकारण्यास दंडाधिकारी नकार देऊ शकेल अथवा त्याने किंवा त्याच्या पूर्वाधिकाऱ्याने पूर्वी स्वीकारलेल्या कोणत्याही जामीनदाराला त्या कारणावरून नाकारू शकेल :
परंतु, असा कोणताही जामीनदार स्वीकारण्यास याप्रमाणे नकार देण्यापूर्वी किंवा तो नाकारण्यापूर्वी तो दंडाधिकारी स्वत: जामीनदाराच्या योग्यतेबाबत शपथेवर रीतसर चौकशी करील किंवा आपणांस दुय्यम असणाऱ्या दंडाधिकाऱ्याकरवी अशी चौकशी करून त्याला त्यावर अहवाल द्यावयास लावील.
२) असा दंडाधिकारी जामीनदाराला आणि ज्या व्यक्तीने जामीनदार देऊ केला तिला, चौकशी करण्यापूर्वी वाजवी नोटीस देईल आणि चौकशी करताना, त्याच्यापूढे दाखल करण्यात आलेल्या पुराव्याचा सारांश नमूद करील.
३) आपल्यापुढे किंवा पोटकलम (१)खाली प्रतिनियुक्त केलेल्या दंडाधिकाऱ्यापुढे याप्रमाणे दाखल करण्यात आलेला पुरावा व तसेच अशा दंडाधिकाऱ्याचा कोणताही अहवाल असल्यास तो विचारात घेतल्यानंतर, जामीनपत्राच्या प्रयोजनांकरता तो जामीनदार ही अयोग्य व्यक्ती आहे अशी दंडाधिकाऱ्याची खात्री झाली तर, तो, असा जामीनदार स्वीकारण्यास नकार देणारा किंवा प्रकरणपरत्वे, त्याला नाकारणारा आदेश काढील आणि तसे करण्याच्या आपल्या कारणांची त्यात नोंद करील:
परंतु, तो जामीनदार पूर्वी स्वीकारलेला होता त्याला नाकारणारा आदेश काढण्यापूर्वी, आपणास योग्य वाटेल त्याप्रमाणे दंडाधिकारी आपले समन्स किंवा वॉरंट काढील, आणि ज्या व्यक्तीकरता जामीनदार बांधलेला असेल तिला आपल्यापुढे उपस्थित व्हावयास लावील किंवा आणवील.