Bns 2023 कलम १२९ : फौजदारीपात्र बलप्रयोग :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १२९ :
फौजदारीपात्र बलप्रयोग :
जर कोणी कोणत्याही व्यक्तीच्या बाबतीत, त्या व्यक्तीच्या संमतीशिवार उद्देशपूर्वक बलप्रयोग केला आणि तो कोणत्याही अपराध करण्याच्या प्रयोजनार्थ असेल अथवा ज्या व्यक्तीच्या बाबतीत बलप्रयोग करण्यात आला त्या व्यक्तीस अशा बलप्रयोगाद्वारे क्षती (नुकसान) पोचावी किंवा भीती वाटावी किंवा त्रास व्हावा असा त्याचा उद्देश असेल अथवा अशा बलप्रयोगामुळे तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असेल तर, तो त्या अन्य व्यक्तीच्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग करतो असे म्हटले जाते.
उदाहरणे :
(a) क) (य) हा नदीकिनाऱ्याला दोराने बांधून ठेवलेल्या नावेत बसलेला आहे. (क) दोर सोडून टाकतो आणि अशाप्रकारे उद्देशपूर्वक नावेला प्रवाहामध्ये वाहत जायला लावतो. याबाबतीत (क) उद्देशपूर्वक (य) च्या ठायी गती निर्माण करतो, आणि तो पदार्थांना अशा रीतीने विशिष्ट स्थितीत ठेवून ही गोष्ट करतो की, कोणत्याही व्यक्तीला अन्य कोणतीही कृती करावी न लागता गती निर्माण होते. म्हणून (क) ने (य) च्या बाबतीत उद्देशपूर्वक बलप्रयोग केला आहे आणि जर कोणताही अपराध करण्यासाठी किंवा या बलप्रयोगामुळे (य) ला क्षती पोचावी, भीती वाटावी किंवा त्रास व्हावा अशा उद्देशाने किंवा तसे होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना (क) ने (य) च्या संमतीवाचून तसे केले असेल तर, (क) ने (य) च्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग केलेला आहे.
(b) ख) (य) रथावर आरुढ झाला आहे. (क) हा (य) च्या घोड्यांना चाबूक मारतो व त्याद्वारे त्यांना त्यांचा वेग वाढवायला भाग पाडतो. या बाबतीत (क) ने प्राण्यांना त्यांच्या गतीत बदल करण्यास प्रवृत्त करुन (य) च्या गतीमध्ये बदल घडवला आहे. त्याअर्थी, (क) ने (य) वर बलप्रयोग केला आहे आणि जर (य) ला त्यामुळे क्षती पोचावी, भीती वाटावी किंवा त्रास व्हावा या उद्देशाने किंवा तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना (क) ने (य) च्या संमतीवाचून हे केले असेल तर, (क) ने (य) च्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग केला आहे.
(c) ग) (य) पालखीमधून जात आहे. (य) ची जबरी चोरी करण्याच्या उद्देशाने (क) पालखीचा दांडा धरतो व पालखी थांबवतो. या बाबतीत (क) ने (य) च्या ठायी गतिविराम घडवून आणला असून त्याने हे आपल्या शारीरिक सामथ्र्याने केले आहे. त्याअर्थी, (क) ने (ग) च्या बाबतीत बलप्रयोग केला आहे आणि (क) ने अपराध करण्यासाठी उद्देशपूर्वक (य) च्या संमतीवाचून हे केले असल्यामुळे, (क) ने (य) च्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग केला आहे.
(d) घ) (क) हा (य) ला रस्त्यामध्ये उद्देशपूर्वक धक्का मारतो. या बाबतीत (क) ने स्वत:च्या शारीरिक सामथ्र्याचा वापर करुन (य) शी संपर्क होईल अशाप्रकारे स्वत:च्या शरीराला गती दिली आहे. त्याअर्थी, (क) ने (य) च्या बाबतीत उद्देशपूर्वक बलप्रयोग केला आहे, आणि जर त्यामुळे (य) ला क्षती पोचावी भीती वाटावी किंवा त्रास व्हावा या उद्देशाने किंवा तसे होण्यास आपण कारण होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना (क) ने (य) च्या संमतीवाचून तसे केले असेल तर, त्याने (य) च्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग केला आहे.
(e) ङ) (क) एक दगड फेकतो, त्या दगडाचा अशा प्रकारे (य) शी किंवा (य) च्या पोशाखाशी किंवा (य) ने जवळ बाळगलेल्या कोणत्याही वस्तूशी संपर्क घडावा अथवा किंवां तो दगड पाण्यात पडून (य) च्या कपड्यांवर किंवा (य) ने जवळ बाळगलेल्या कोणत्याही वस्तूवर पाणी उडावे असा (क) चा उद्देश आहे किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव आहे. याबाबतीत, जर दगडफेकीमुळे परिणामी एखाद्या पदार्थाचा (य) शी किंवा त्याच्या कपड्यांशी संपर्क घडून आला असेल तर, (क) ने (य) च्या बाबतीत बलप्रयोग केला आहे, आणि जर त्यामुळे (य) ला क्षती पोचावी, भीती वाटावी किंवा त्रास व्हावा अशा उद्देशाने (क) ने (य) च्या संमतीवाचून तसे केले असेल तर, (क) ने (य) च्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग केला आहे.
(f) च) (क) एका स्त्रीचा बुरखा उद्देशपूर्वक ओढतो. याबाबतीत, (क) तिच्या बाबतीत उद्देशपूर्वक बलप्रयोग करतो, आणि जर त्यामुळे तिला क्षती पोचावी, भीती वाटावी किंवा त्रास व्हावा अशा उद्देशाने किंवा तसे होण्याचा संभव असल्याची जाणीव असताना त्याने तिच्या संमतीवाचून तसे केले असेल तर, त्याने तिच्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग केला आहे.
(g) छ) (य) स्नान करीत आहे. (क) आंघोळीच्या पाण्यामध्ये उकळते पाणी, ते उकळते आहे हे माहीत असून ओततो. याबाबतीत, (क) उद्देशपूर्वक स्वत:च्या शारीरिक सामथ्र्याने उकळत्या पाण्यामध्ये अशाप्रकारे गती निर्माण करतो की, ज्यामुळे त्या पाण्याचा (य) शी संपर्क घडतो किंवा अशा संपर्कामुळे (य) च्या स्पर्श-संवेदनेवर नक्कीचच परिणाम होईल अशा ठिकाणी असलेल्या दुसऱ्या पाण्याशी संपर्क घडतो. त्याअर्थी, (क) ने (य) च्या बाबतीत उद्देशपूर्वक बलप्रयोग केला आहे, आणि जर त्यामुळे (य) ला क्षती पोचावी किंवा भीती वाटावी किंवा त्रास व्हावा या उद्देशाने किंवा तसे होण्याचा संभव असल्याची त्याला जाणीव असताना (क) ने (य) च्या समंतीवाचून तसे केले असेल तर, त्याने फौजदारीपात्र बलप्रयोग केला आहे.
(h) ज) (य) या संमतीवाचून (क) हा कुर्त्याला (य) च्या अंगावर धावून जाण्यास चिथावणी देतो. याबाबतीत, (य) ला क्षती पोचावी, भीती वाटावी किंवा त्रास व्हावा असा (क) चा उद्देश असेल तर, तो (य) च्या बाबतीत फौजदारीपात्र बलप्रयोग करतो.

Leave a Reply