भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ९ :
अनेक अपराध मिळून बनलेल्या अपराधाबद्दलच्या शिक्षेची मर्यादा :
१) अपराध असलेली कोणतीही घटना जर अनेक भागांनी बनलेली असेल आणि त्यापैकी कोणताही भाग हा स्वयमेव अपराध होत असेल, त्या बाबतीत, अपराध्याला त्याच्या अशा अपराधांपैकी एकापेक्षा अधिक अपराधाबद्दलची शिक्षा देता येणार नाही; परंतु जर तसे स्पष्टपणे तरतूद केली असेल, तर गोष्ट अलाहिदा (वेगळी).
२) (a) क) (अ) त्या त्या वेळी अमलात असलेल्या ज्या कोणत्याही कायद्याद्वारे अपराधांची व्याख्या दिलेली असेल किंवा त्याबद्दल शिक्षा देण्यात येत असेल त्या कायद्याच्या दोन किंवा अधिक वेगवेगळ्या व्याख्यांनुसार एखादी घटना अपराध होत असेल त्या बाबतीत, किंवा
(b) ख) (ब) त्यांच्यापैकी एक किंवा एकाहून अधिक कृती स्वयमेव (स्वत:च) अपराध ठरण्यासारख्या आहेत अशा अनेक कृती मिळून एखादा वेगळाच अपराध घडत असेल त्या बाबतीत, त्या अपराध्याला, त्याची संपरीक्षा (विचारणा) करणारे न्यायालय अशापैकी कोणत्याही एका अपराधाबद्दल जितकी कडक शिक्षा देऊ शकले असते त्यापेक्षा अधिक कडक शिक्षा देता येणार नाही.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (य) ला काठीने पन्नास तडाखे हाणतो. येथे (क) ने संपूर्ण मारहाणीद्वारे आणि ती संपूर्ण मारहाण ज्या प्रहारांनी मिळून बनली त्या प्रत्येक प्रहाराद्वारेदेखील (य) ला इच्छापूर्वक दुखापत करण्याचा अपराध केलेला असू शकेल. जर (क) हा प्रत्येक प्रहाराबद्दल शिक्षेस पात्र असता तर प्रत्येक प्रहारागणिक एक वर्ष याप्रमाणे पन्नास वर्ष कारागृहात ठेवता आले असते. परंतु तो संपूर्ण मारहाणीबद्दल फक्त एकाच शिक्षेस पात्र आहे.
(b) ख) परंतु, (क) हा (य) ला मारहाण करत असताना (म) मध्ये पडला व (क) ने (म) वर उद्देशपूर्वक तडाखा हाणला तर, (म) वर केलेला प्रहार हा ज्या कृतींद्वारे (क) हा (य) ला इच्छापूर्वक दुखापत करतो त्याचा भाग नसल्यामुळे (क) हा (य) ला इच्छापूर्वक दुखापत केल्याबद्दल एका शिक्षेला आणि (म) वर केलेल्या प्रहाराबद्दल दुसऱ्या शिक्षेला पात्र आहे.
Pingback: Ipc कलम ७१ : अनेक अपराध मिळून बनलेल्या अपराधाबद्दलच्या..