भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ७७ :
चोरुन अश्लील चित्रण करणे :
कलम : ७७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : चोरुन अश्लील चित्रण करणे
शिक्षा : पहिल्या अपराध सिद्धसाठी किमान १ वर्षे किंवा कमाल ३ वर्षे कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र :जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
अपराध : दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधसिद्धीसाठी.
शिक्षा : दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या अपराधसिद्धीसाठी किमान ३ वर्षे किंवा कमाल ७ वर्षे कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : सत्र न्यायालय.
———
एखादी स्त्री, ज्या परिस्थितीत, एखादा चित्रण करणारा किंवा त्याच्या आज्ञेने (त्याच्यावतीने) काम करणारा कोणी सर्वसामान्यपणे पाहू शकणार नाही अशी तिची अपेक्षा असलेल्या ठिकाणी एकांतवासातील कृती करण्यात गुंतलेली असताना जो कोणी तिला पाहील किंवा तिचे चित्रण करील किंवा असे चित्रण प्रसारित करील त्याला, तो प्रथमत: सिद्ध दोष ठरल्यावर, एक वर्षांपेक्षा कमी नाही परंतु तीन वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र असेल, आणि दुसऱ्यांदा किंवा त्यानंतर सिद्ध दोष ठरेल तेव्हा तीन वर्षांपेक्षा कमी नाही परंतु सात वर्षांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो दंडासही पात्र असेल.
स्पष्टीकरण १ :
या कलमाच्या प्रयोजनासाठी एकान्तवासातील कृती यामध्ये, ज्या जागेत, त्या परिस्थितीत वाजवी एकांतता पुरविण्यात येईल अशी अपेक्षा असेल आणि जेथे पीडित व्यक्तीचे गुप्तांग, नितंब किंवा स्तन उघडे केलेले असतील किंवा फक्त आतल्या कपड्यांनी झाकलेले असतील किंवा पीडित व्यक्ती शौचालयाचा वापर करीत असेल, किंवा पीडित व्यक्ती सर्वसाधारणपणे सार्वजनिक ठिकाणी करीत नसतात अशी लैंगिक कृती करीत असेल अशा ठिकाणी चोरुन पाहाण्याच्या कृतीचा समावेश होतो.
स्पष्टीकरण २ :
जेव्हा कोणतेही छायाचित्र घेण्यास किंवा कोणत्याही कृतीचे चित्रण करण्यास त्या पीडित व्यक्तीने संमती दिली असेल्र परंतु तिचे त्रयस्थ व्यक्तींना प्रसारण करण्यास संमती दिली नसेल आणि असे छायाचित्रण किंवा कृतीचे चित्रण प्रसारित करण्यात आले असेल तेव्हा, असे प्रसारण हे या कलमाखालील अपराध मानण्यात येईल.