Bns 2023 कलम ७२ : विवक्षित अपराधांना बळी पडलेली व्यक्ती कोण ते उघड करणे इत्यादी:

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ७२ :
विवक्षित अपराधांना बळी पडलेली व्यक्ती कोण ते उघड करणे इत्यादी:
कलम : ७२ (१)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : विवक्षित अपराधांना बळी पडलेली व्यक्ती कोण ते उघड करणे इत्यादी.
शिक्षा : दोन वर्षाचा कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) कलम ६४, कलम ६५, कलम ६६, कलम ६७, कलम ६८, कलम ६९, कलम ७० किंवा कलम ७१ या खाली ज्या व्यक्तीविरूध्द अपराध घडल्याचे अभिकथन करण्यात आले असेल, किंवा तसे आढळले असेल ती व्यक्ती कोण (या कलमात यापुढे बळी पडलेली व्यक्ती म्हणून निर्दिष्ट (उल्लेख)) हे ज्यावरून ज्ञात (समजून) होईल असे नाम किंवा मजकूर जो कोणी मुद्रित किंवा प्रकाशित करील त्याला, दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
२) बळी पडलेली व्यक्ती कोण हे ज्यावरून ज्ञात (समजू) होऊ शकेल असे नाव किंवा मजकूर यांचे मुद्रण किंवा प्रकाशन हे जर, –
(a) क) पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याने किंवा अशा अपराधाबाबत अन्वेषण (तपास करणाऱ्या) पोलीस अधिाकाऱ्याने सद्भावपूर्वक अशा अन्वेषणाच्या (तपासाकामी) प्रयोजनार्थ, अथवा त्याच्या लेखी आदेशानुसार केलेले असेल तर; किंवा
(b) ख) बळी पडलेल्या व्यक्तीने किंवा तिच्या लेखी प्राधिकारान्वये (अधिकारान्वये) केलेले असेल तर; किंवा
(c) ग) बळी पडलेली व्यक्ती मरण पावली असेल किंवा अज्ञान असेल किंवा मनोविकल असेल त्याबाबतीत बळी पडलेल्या व्यक्तीच्या निकट आप्त संबंधीने अथवा त्याच्या लेखी प्राधिकारान्वये (अधिकारपत्राद्वारे) केले असेल तर,
अशा मुद्रणाला किंवा प्रकाशनाला पोटकलम (१) मधील काहीही लागू होत नाही :
परंतु निकट आप्तसंबंधीने असे अधिकारपत्र कोणत्याही मान्याताप्राप्त कल्याणकारी संस्थेचा किंवा संघटनेचा अध्यक्ष किंवा सचिव, मग त्याचे नामाभिधान काहीही असो याच्याशिवाय अन्य कोणाही व्यक्तीस देता कामा नये.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनार्थ, मान्यताप्राप्त कल्याणकारी संस्था किंवा संघटना म्हणजे केंद्र शासनाने किंवा राज्य शासनाने याद्वारे मान्यता दिलेली सामाजिक कल्याणकारी संस्था किंवा संघटना होय.

This Post Has One Comment

Leave a Reply