भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ५७ :
जनतेकडून अगर दहापेक्षा जास्त व्यक्तींकडून अपराध घडून येण्याकरिता अपप्रेरणा (चिथावणी) देणे :
कलम : ५७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जनतेकडून किंवा दहाहून जास्त व्यक्तींकडून अपराध घडून येण्यास अपप्रेरणा देणे.
शिक्षा : ७ वर्षापर्यंत कारावास व द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
जो कोणी आमजनतेकडून किंवा दहापेक्षा जास्त अशा कितीही व्यक्तींकडून किंवा अशा कोणत्याही वर्गाच्या व्यक्तींकडून अपराध घडून येण्यास अपप्रेरणा (चिथावणी) देईल, त्यास सात वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची व द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
उदाहरण :
दहाहून जास्त सभासद असणाऱ्या एका पंथाला, विरुद्ध पंथाचे सभासद मिरवणुकीने जात असता त्यांच्यावर हल्ला करण्यासाठी विवक्षित वेळी व स्थळी सभा घेण्यास चिथावणी देणारा घोषणाफलक (क) सार्वजनिक ठिकाणी लावतो. (क) ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केलेला आहे.
Pingback: Ipc कलम ११७ : जनतेकडून अगर दहापेक्षा जास्त व्यक्तींकडून..