भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ४९ :
अपप्रेरणामुळे (चिथावणीमुळे) परिणामत: अपप्रेरित कृती घडली असून, त्या अपप्रेरणाकरता (चिथावणीकरता) शिक्षेचा कोणताही उपबंध केलेला नसल्यास (स्वतंत्र शिक्षेची तरतूद नसेल) त्याबद्दल शिक्षा :
कलम : ४९
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही अपराधांचे अपप्रेरण, जर अपप्रेरणामुळे परिणामत: अपप्रेरित कृती घडली असून त्या अपप्रेरणाकरिता शिक्षेचा कोणताही उपबंध केलेला नसल्यास.
शिक्षा : अपप्रेरित अपराधाला असेल तीच.
दखलपात्र / अदखलपात्र : अपप्रेरित अपराध दखलपात्र किंवा अदखलपात्र असेल त्यानुसार.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अपप्रेरित अपराध जामीनपात्र किंवा अजामीनपात्र असेल त्यानुसार.
शमनीय / अशमनीय : अपप्रेरित अपराध शमनीय किंवा अशमनीय असेल त्यानुसार.
कोणत्या नायालयात विचारणीय : अपप्रेरित अपराध ज्या न्यायालयात विचारणीय असेल ते न्यायालय.
———
जो कोणी एखाद्या अपराधाला अपप्रेरणा (चिथावणी) देइल त्याला, जर अपप्रेरणाचा (चिथावणीचा) परिणाम म्हणून अपप्रेरित कृती घडली आणि तशा अपप्रेरणाकरता या संहितेत शिक्षेची खास तरतूद नसेल, तर मूळ अपराधाला जी शिक्षा असते तीच शिक्षा होईल.
स्पष्टीकरण:
एखादी कृती किंवा अपराध अपप्रेरणाला घटकभूत अशा चिथावणीचा परिणाम म्हणून किंवा अशा कटाला अनुसरुन किंवा अशा साहाय्यानिशी घडतो तेव्हा, ते अपप्रेरणाचा परिणाम म्हणून घडले असे म्हटले जाते.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (ख) ला खोटा पुरावा देण्यास चिथावणी देतो. चिथावणीच्या परिणामी (ख) अपराध करतो. त्या अपराधाला अपप्रेरणा दिल्याबद्दल (क) दोषी आहे आणि (ख) प्रमाणे त्याच शिक्षेला पात्र आहे.
(b) ख) (क) व (ख) हे (य) ला विषप्रयोग करण्याचा कट करतात. कटानुसार (क) विष पैदा करतो आणि (ख) ने ते विष (य) ला द्यावे म्हणून ते (ख) कडे सुपूर्द करतो. कटानुसार, (क) च्या अनुपस्थितीत (ख) ते विष (य) ला देतो आणि त्याद्वारे (य) चा मृत्यू घडवून आणतो. याबाबतीत (ख) खुनाबद्दल दोषी आहे. (क) हा कट करुन त्या अपराधास अपप्रेरणा देण्याबद्दल दोषी आहे, आणि खुनाबद्दलच्या शिक्षेस पात्र आहे.
Pingback: Ipc कलम १०९ : अपप्रेरणामुळे परिणामत: अपप्रेरित कृती घडली..