भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३ :
साधारण स्पष्टीकरण आणि पद (अर्थ / व्यक्त करणे) :
या संहितेमध्ये सर्वत्र प्रत्येक अपराधाची व्याख्या, प्रत्येक दंडविषयक उपबंध व अशा प्रत्येक व्याख्येचे किंवा दंडविषयक उपबंधाचे प्रत्येक उदाहरण ही, सर्वसाधारण अपवाद या नावाच्या प्रकरणात जे अपवादद अंतर्भूत आहेत त्यांची अशा व्याख्येत, दंडविषयक उपबंधात किंवा उदाहरणात जरी पुनरावृत्ती केलेली नसली तरी, त्या अपवादांस अधीन असल्याचे मानले जाईल.
उदाहरणे :
(a) क) (अ) या संहितेतील ज्या कलमांत अपराधांच्या व्याख्या अंतर्भूत आहेत त्यांत, सात वर्षे वयाखालील बालक असा अपराध करु शकत नही असे व्यक्त केलेले नाही; परंतु सात वर्षे वयाखालील बालकाने केले असेल असे कोणतेही कृत्य अपराधध होत नाही असा उपबंध करणाऱ्या सर्वसाधारण अपवादास त्या व्याख्या अधीन आहेत असे अध्याहत समजावयाचे आहे.
(b) ख) (क) हा पोलीस अधिकारी, ज्याने खून केला आहे अशा (य) ला वॉरंटाविना पकडतो. येथे (क) हा गैर परिरोधाच्या अपरादाबद्दल दोषी नाही; कारण (य) ला पकडण्यास तो विधित: बद्ध होता, आणि म्हणून ती बाब जी (जी गोष्ट करण्यास एखादी व्यक्ती बद्ध आहे अशी कोणतीही गोष्ट तिने केली असता ती अपराध होत नाही) असा उपबंध करणाऱ्या सर्वसाधारण अपवादाखाली येते.
२) या संहितेच्या कोणत्याही भागात (कलमात) स्पष्टीकरण केलेला प्रत्येक शब्दप्रयोग जरी पुन्हा इतरत्र कलमात आला तरी तोच समजून योजलेला आहे.
३) जेव्हा एखादी मालमत्ता एखाद्या व्यक्तीच्या तर्फे (कारणे) त्या व्यक्तीच्या पत्नीच्या, कारकुनाच्या किंवा चाकराच्या कब्जात असते तेव्हा या संहितेच्या अर्थानुसार ती त्या व्यक्तीच्या कब्जातच असते.
स्पष्टीकरण :
तात्पुरती किंवा विशिष्ट प्रसंगी कारकून (लिपिक) किंवा चाकर (नोकर) या नात्याने नोकरीवर ठेवलेली व्यक्ती या पोटकलमाच्या अर्थानुसार कारकून(लिपिक) किंवा चाकर असते.
४) या संहितेच्या प्रत्येक भागामध्ये, संदर्भावरुन विरुद्ध उद्देश दिसून येत असल्यास ते खेरीज करुन एरव्ही, केलेल्या कृतींचा निर्देश करणाऱ्या शब्दांच्या व्याप्तीत अवैध अकृतीदेखील येतात.
५) जेव्हा दोन किंवा अधिक व्यक्तींनी, त्या सर्वांच्या समान उद्देशाच्या पुर:सरणार्थ गुन्हेगारी कृती केलेली असते तेव्हा, अशांपैकी प्रत्येक व्यक्ती जणू काही ती कृती तिने एकटीनेच केलेली असावी त्याप्रमाणे त्याच रीतीने त्याबद्दल दायी होते.
६) जी कृती गुन्हेगारी जाणीव किंवा उद्देश असताना ती करण्यात आली एवढ्याच कारणाने गुन्हेगारी स्वरुपाची असते ती जेव्हा केव्हा दोन किंवा अधिक व्यक्तींनी केलेली असते तेव्हा, अशा व्यक्तींपैकी जो अशी जाणीव किंवा उद्देश असताना त्या कृतीत सामील होतो तो प्रत्येकजण जणू काही ती जाणीव किंवा उद्देश असताना त्याने एकट्याने ती कृती केलेली असावी त्याप्रमाणे त्याच रीतीने दायी होतो.
७) जेथे जेथे कृतीद्वारे किंवा अकृतीद्वारे विवक्षित परिणाम घडवून आणणे किंवा तो परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न करणे हा अपराध असतो तेथे तेथे, अंशत: कृतीद्वारे व अंशत: अकृतीद्वारे परिणाम घडवून आणणे हा तोच अपराध असतो असे समजावयाचे असते.
उदाहरण :
(क) हा अंशत: (य) ला अन्न देण्याचे अवैधपणे टाळून व अंशत: (य) ला मारहाण करुन उद्देशपूर्वक (य) चा मृत्यू घडवून आणतो. (क) ने खून केलेला आहे.
८) जेव्हा एखादा अपराध निरनिराळ्या कृती करुन केला जात असतो आणि त्या वेळी जो कोणी उद्देशपूर्वक सहकार्य करतो म्हणजेच त्यापैकी एखादे कृत्य स्वत: करतो अगर इतरांसह संयुक्तपणे करतो, तर त्याने तो अपराध केलेला आहे असे होते.
उदाहरण :
(a) क) (क) आणि (ख) हे त्यांच्यापैकी प्रत्येकाने स्वतंत्रपणे व निरनिराळ्या वेळी (य) ला विषाचे लहान लहान मितभाग देऊन त्याचा खून करावा असे मिळून ठरवतात. (क) व (ख) है (य) चा खून करण्याच्या उद्देशाने ठरल्यानुसार विष देतात. (य) हा त्याला त्याप्रमाणे देण्यात आलेल्या विषाच्या अनेक मितभागांच्या परिणामामुळे मरण पावतो. याबाबतीत (क) व (ख) खून करण्याच्या कामी उद्देशपूर्वक सहकार्य करतात व त्यांच्यापैकी प्रत्येकजण जिच्यामुळे मृत्यु घडून येतो अशी कृती करतो, म्हणून ते दोघेही, जरी त्यांच्या कृती वेगवेगळ्या असल्या तरी, त्या अपराधाबद्दल दोषी आहेत.
(b) ख) (क) व (ख) संयुक्त तुरुंगाधिकारी आहेत व त्या नात्याने त्यांच्याकडे आलटून पालटून (य) या कैद्याचा एका वेळेस सहा सहा तासांसाठी ताबा असतो. (य) चा मृत्यु घडवून आणण्याच्या उद्देशाने (क) व (ख) है (य) ला देण्यासाठी म्हणून त्यांना पुरवठा केलेले अन्न, आपापल्या देखरेखीच्या वेळात त्याला देण्याचे अवैधपणे टाळून, तो परिणाम घडवून आणण्याच्या कामी जाणूनबुजून सहकार्य करतात. (य) भुकेपायी मरण पावतो. (क) व (ख) दोघेही (य) च्या खुनाबद्दल दोषी आहेत.
(c) ग) (क) या तुरुंगाधिकाऱ्याकडे (य) या कैद्याचा ताबा आहे. (क) हा (य) चा मृत्यु घडवून आणण्याच्या उद्देशाने (य) ला अन्न पुरवण्याचे अवैधपणे टाळतो; त्याचा परिणाम म्हणून (य) ची शक्ती बरीच क्षीण होते, पण ती उपासमार त्याचा मृत्यु घडवून आणण्यास पुरेशी नाही. (क) ला त्याच्या पदावरुन काढून टाकण्यात येते आणि (ख) त्याचा उत्तराधिकारी होतो. (क) शी संगनमत किंवा सहकार्य न करता, आणि (य) ला अन्न देण्याचे अवैधपणे टाळण्याने आपण त्याच्या मृत्युला कारण होण्याचा संभव आहे ही जाणीव असताना (ख) तसे करतो. (य) भुकेपायी मरण पावतो. (ख) खुनाबद्दल दोषी आहे. पण (क) ने (ख) शी सहकार्य केलेले नसल्याने (क) केवळ खुन करण्याच्या प्रयत्नाबद्दल दोषी आहे.
९) जेथे निरनिराळ्या व्यक्ती एखादी गुन्हेगारी कृती करण्यात सहभागी किंवा निबद्ध (संबंधित) असतात, तेथे त्या कृतीमुळे त्या निरनिराळ्या अपराधांबद्दल दोषी होऊ शकतील.
उदाहरण :
(क) हा (य) वर अशा गंभीर प्रक्षोभक परिस्थितीत हल्ला करतो की, त्याने (य) ला ठार मारणे म्हणजे खून या सदरात न मोडणारा केवळ सदोष मनुष्टवध ठरु शकेल. (ख) हा (य) बद्दल द्वेषभाव असताना व त्याला मारण्याच्या उद्देशाने आणि त्याच्या बाबतीत प्रक्षोभकारण नसताना (य) ला ठार मारण्यास (क) ला सहाय्य करतो. याबाबतीत (क) व (ख) दोघेही (य) चा मृत्यु घडवून आणण्याच्या कामात सहभागी असले तरी, (ख) खुनाबद्दल दोषी आहे व (क) केवळ सदोष मनुष्य वधाबद्दलच दोषी आहे.