भारतीय न्याय संहिता २०२३
कलम ३२ :
धमक्यांद्वारे जी कृती करण्याची सक्ती व्यक्तीवर होते ती कृती :
खून आणि मृत्युच्या शिक्षेस पात्र असलेले देशविरोधी अपराध खेरीजकरुन, एखादी गोष्ट (कृती) करण्याच्या वेळी एखाद्या व्यक्तीवर, ती कृती केली नाही तर परिणामी त्या व्यक्तीचा किंवा त्या व्यक्तीच्या त्यावेळी हजर असलेल्या कोणत्याही जवळच्या नातलगाचा तात्काळ मृत्यू घडेल किंवा त्याला जबर शारीरिक अपाय घडेल अशी धास्ती वाजवीपणे निर्माण करणाऱ्या धमक्यांमुळे ती गोष्ट (कृती) करण्याची सक्ती होते तेव्हा, तिने केलेली ती गोष्ट (कृती) अपराध होत नाही :
परंतु ती कृती करणाऱ्या व्यक्तीने स्वत: होऊन अथवा तात्काळ मृत्यू किंवा जबर शारीरिक अपाय याहून सौम्य असा अपाय स्वत:ला घडेल अशा वाजवी धास्ती मुळे, जेणेकरुन तिच्यावर अशी बळजबरी होईल, अशी परिस्थिती ओढवून घेतलेली असता कामा नये.
स्पष्टीकरण १ :
जी व्यक्ती स्वत: होऊन किंवा मारहाणीच्या धमकीमुळे दरोडेखोरांच्या टोळीत त्यांचे खरे स्वरूप माहीत असताना सामील होते त्या व्यक्तीला विधित: (कायद्याने) अपराध असेल अशी कोणतीही गोष्ट (कृती) करण्यास तिच्या साथीदारांनी सक्ती केली, या कारणावरून ती व्यक्ती या अपवादाचा फायदा मिळण्यास हक्कदार होत नाही.
स्पष्टीकरण २ :
दरोडेखोरांच्या टोळीने एखाद्या व्यक्तीला पकडले आणि तत्काळ मृत्यूची धमकी देऊन त्याला विधित: अपराध असेल अशी गोष्ट (कृती) करण्यास भाग पाडले तर, उदाहरणार्थ, दरोेडेखोरांना एका घरात प्रवेश करून ते लुटता यावे म्हणून आपली हत्यारे घेऊन त्या घराचा दरवाजा फोडण्याची एखाद्या लोहारावर सक्ती करण्यात आली, तर तो या अपवादाचा फायदा मिळण्यास हक्कदार आहे.
Pingback: Ipc कलम ९४ : धमक्यांद्वारे जी कृती करण्याची सक्ती व्यक्तीवर