Bns 2023 कलम ३२९ : फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण आणि गृह अतिक्रमण करणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण :
कलम ३२९ :
फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण आणि गृह अतिक्रमण करणे :
कलम : ३२९ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : फौजदारीपात्र अतिक्रमण.
शिक्षा : ३ महिन्यांचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्यासंपत्तीबाबत अतिक्रमण झाले तिचा कब्जा असलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी
———
कलम : ३२९ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : गृह-अतिक्रमण.
शिक्षा :१ वर्षाचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : ज्यासंपत्तीबाबत अतिक्रमण झाले तिचा कब्जा असलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) जो कोणी दुसऱ्याच्या कब्जात असलेल्या मालमत्तेच्या जागेत किंवा जागेवर, अपराध करण्याचा अथवा अशी मालमत्ता जिच्या कब्जात असेल अशा कोणत्याही व्यक्तीला धाकदपटशा दाखविण्याच्या, तिचा अपमान करण्याच्या किंवा तिला त्रास देण्याच्या उद्देशाने प्रवेश करतो, किंवा अशा मालमत्तेच्या जागेत किंवा जागेवर कायदेशीरपणे प्रवेश केल्यानंतर अशा कोणत्याही व्यक्तीला धाकदपटशा दाखवण्याच्या,तिचा अपमान करण्याच्या, किंवा तिला त्रास देण्याच्या उद्देशाने अथवा एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने तेथे बेकायदेशीरपणे थांबून राहतो तो फौजदारीपात्र (आपराधिक) अतिक्रमण करतो, असे म्हटले जाते.
२) माणसाचे वसतिस्थान म्हणून वापरली जाणारी कोणतीही इमारत, तंबू किंवा जलयान, अथवा उपासनास्थान म्हणून किंवा मालमत्तेच्या अभिरक्षेचे स्थान म्हणून वापरली जाणारी कोणतीही इमारत यामध्ये प्रवेश करुन किंवा तेथे थांबून जो कोणी फौजदारीपात्र अतिक्रमण करतो तो गृह-अतिक्रमण करतो असे म्हटले जाते.
स्पष्टीकरण :
फौजदारीपात्र अतिक्रमण करणारा माणूस प्रवेश करत असताना त्याच्या शरीराचा कोणताही भाग आत शिरला की, गृह-अतिक्रमण घडण्यास तेवढे पुरेसे होते.
३) जो कोणी फौजदारीपात्र अतिक्रमण करील त्याला, तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा पाच हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
४) जो कोणी गृह-अतिक्रमण करील त्याला एक वर्षापर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची, किंवा पाच हजार रुपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.

Leave a Reply