भारतीय न्याय संहिता २०२३
मालमत्तेच्या आपराधिक अपहारा (अफरातफर / गैरवापर) विषयी :
कलम ३१४ :
मालमत्तेचा अप्रामाणिक अपहार (अफरातफर / गैरवापर) :
कलम : ३१४
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : जंगम मालमत्तेचा अप्रामाणिकपणे अपहार करणे किंवा ती आपल्या उपयोगासाठी स्वत:ची म्हणून वापरणे.
शिक्षा : सहा महिन्यापेक्षा कमी नाही परंतु २ वर्षांचा कारावास आणि द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अपहार केलेल्या संपत्तीचा मालक.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जो कोणी कोणत्याही जंगम मालमत्तेचा अप्रामणिकपणाने अपहार (अफरातफर / गैरवापर) करील, किंवा आपल्या उपयोगासाठी स्वत:ची म्हणून ती वापरील त्याला, सहा महिन्यांपैकी कमी नसेल परंतु दोन वर्षांपर्यंत असू शेकल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा आणि द्रव्यदंडाची शिक्षा होतील.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (य) ची मालमत्ता (य) च्या कब्जातून घेतो व मालमत्ता अशा प्रकारे घेताना ती मालमत्ता त्याची स्वत:चीच आहे असे तो सद्भावपूर्वक समजतो. (क) चोरी बद्दल दोषी नाही, पण जर आपली चूक त्याला कळून आल्यानंतर, त्याने ती अप्रामाणिकपणाने आपल्या उपयोगासाठी स्वत:ची म्हणून वापरली तर, तो या कलमाखालील अपराधाबद्दल दोषी आहे.
(b) ख) (क) चे (य) बरोबर मैत्रीचे संबंध असून, (य) च्या अनुपस्थितीत तो त्याच्या ग्रंथालयात जातो व (य) च्या स्पष्ट संमतीवाचून एक पुस्तक घेऊन जातो. याबाबतीत, वाचण्यासाठी पुस्तक घेण्याची आपणांस (य) ची उपलक्षित संमती आहे अशी (क) ची धारणा असल्यास (क) ने चोरी केली असे होत नाही. पण (क) ने नंतर त्याच्या स्वत:च्या फायद्यासाठी पुस्तकाची विक्री केली तर, तो या कलमाखालील अपराधाबद्दल दोषी आहे.
(c) ग) (क) आणि (ख) हे एका घोड्याचे संयुक्त मालक असून, घोडा वापरण्याच्या उद्देशाने (क) तो (ख) च्या कब्जामधून घेऊन जातो. याबाबतीत, (क) ला त्या घोड्याचा वापर करण्याचा हक्क असल्याने (क) ने त्या घोड्याचा अप्रामाणिकपणाने अपहार केला असे होत नाही. पण जर (क) ने घोड्याची विक्री केली आणि विक्रीपासून मिळालेली सर्व आवक स्वत:च्या उपयोगासाठी वापरली तर, तो या कलमान्वये अपराधाबद्दल दोषी आहे.
स्पष्टीकरण १ :
काही विशिष्ट काळापुरता केलेला अप्रामाणिक अपहार हा या कलमाच्या अर्थानुसार अपहार आहे.
उदाहरण :
(क) ला कोरे पृष्ठांकन असलेली (य) ची सरकारी वचनचिट्ठी सापडते. ती वचनचिट्ठी (य) ची आहे हे माहीत असून (कक) ती एका बँकव्यवसायीकडे कर्जाचे तारण म्हणून गहाण ठेवतो, असे करताना पुढे केव्हातरी ती वचनचिट्ठी (य) ला परत देण्याचा त्याचा उद्देश आहे. तरीही (क) ने या कलमाखालील अपराध केला आहे.
स्पष्टीकरण २ :
जी व्यक्ति आपणास अन्य कोणाही व्यक्तिच्या कब्जात नसलेली मालमत्ता गवसली असता, मालकाकरिता ती जपून ठेवण्यासाठी, किंवा त्याला ती परत करण्यासाठी अशी मालमत्ता घेईल ती व्यक्ती अप्रामाणिकपणाने ती मालमत्ता घेत नाही, किंवा तिचा अपहार करीत नाही व ती अपराधाबद्दल दोषी होत नाही. पण तिला त्या मालमत्तेचा मालक माहीत असून, किंवा शोधण्याचे साधन तिला उपलब्ध असून, अथवा तिने मालकाला शोधून काढण्यासाठी आणि त्याला नोटीस देण्यासाठी वाजवी साधनांचा अवलंब केला असून, मालकाला त्या मालमत्तेची मागणी करणे शक्य होण्याइतपत वाजवी मुदतीपर्यंत तिने ती ठेवून घेतली आहे असे होण्यापूर्वी जर तिने आपल्या उपयोगाकरिता स्वत:ची म्हणून वापरली तर, ती वर व्याख्या केलेल्या अपराधाबद्दल दोषी होते.
वाजवी साधने कोणती, किंवा वाजवी मुदत कोणती हा अशा प्रकरणी तथ्यविषयक प्रश्न असतो.
मालमत्तेचा मालक कोण आहे किंवा अमुक एक विशिष्ट व्यक्ति मालमत्तेची मालक आहे हे सापडणाऱ्यास माहीत असले पाहिजे, अशी आवश्यकता नाही. ती स्वत:ची म्हणून वापरताना तो, ती स्वत:ची मालमत्ता असे समजत नाही, किंवा मालमत्तेचा खरा मालक सापडू शकत नाही, असे तो सद्भावपूर्वक समजत नाही एवढे पुरेसे आहे.
उदाहरणे :
(a) क) (क) ला भर रस्त्यावर एक रुपया सापडतो, तो रुपया कोणाचा आहे हे त्याला माहीत नाही. (क) तो रुपया उचलतो. याबाबतीत, (क) ने या कलमामध्ये व्याख्या करण्यात आलेला अपराध केलेला नाही.
(b) ख) (क) ला बँक-नोट अंतर्भूत असलेले एक पत्र रस्त्यात सापडते. पत्रातील सूचना व मजकूर वाचून ती बँक-नोट कोणाची आहे हे त्याला समजते. तो ती नोट स्वत:ची म्हणून वापरतो. (क) या कलमाखालील अपराधाबद्दल दोषी आहे.
(c) ग) धारणकर्त्याला प्रदेय असलेला एक धनादेश (क) ला सापडतो. तो धनादेश कोणाकडून गहाळ झाला असावा याविषयी त्याला अंदाज बांधता येत नाही. पण, ज्याने तो धनादेश काढला त्याचे नाव त्यावर दिसते. धनादेश कोणाच्या नावे काढण्यात आला होता हे ती व्यक्ती आपणांस सांगू शकेल हे (क) ला माहीत आहे. मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता (क) तो धनादेश स्वत:चा म्हणून वापरतो. (क) या कलमाखालील अपराधाबद्दल दोषी आहे.
(d) घ) (य) चा पैशांनी भरलेले पाकीट खाली पडताना (क) पाहतो. (य) ला परत देण्याच्या उद्देशाने (क) ते पाकीट उचलतो, पण नंतर ते स्वत:च्या उपयोगाकरिता स्वत:चे म्हणून वापरतो. (क) ने या कलमाखालील अपराध केला आहे.
(e) ङ) (क) ला पैशांनी भरलेले पाकीट सापडते, ते कोणाचे आहे हे त्याला माहीत नाही. ते पाकीट (य) चे आहे असे त्याला नंतर समजते, आणि तो ते आपल्या उपयोगाकरता स्वत:चे म्हणून वापरतो (क) या कलमाखालील अपराधाबद्दल दोषी आहे.
(f) च) (क) ला मूल्यवान आंगठी सापडते, ती कोणाची आहे हे त्याला माहीत नाही. मालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न न करता (क) ती आंगठी ताबडतोब विकतो. (क) या कलमाखालील अपराधाबद्दल दोषी आहे.