भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २८७ :
आग अगर ज्वालाग्राही पदार्थ यांच्याबाबत हयगयीचे वर्तन :
कलम : २८७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : ज्यामुळे मानवी जीवित धोक्यात येणे, इत्यादी गोष्टी होतील अशा प्रकारे आग किंवा कोणताही ज्वालाग्राही पदार्थ यांच्याबाबत हयगयीचे वर्तन करणे.
शिक्षा : ६ महिन्यांचा कारावास, किंवा २००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
ज्यामुळे मानवी जीवन धोक्यात येईल अथवा अन्य कोणत्याही व्यक्तीला दुखापत किंवा क्षती (नुकसान) पोचण्याचा संभव असेल इतक्या बेदरकारपणे किंवा हयगयीने जो कोणी आगीबाबत किंवा कोणत्याही ज्वालाग्राही पदार्थाबाबत कोणतीही कृती करील, अथवा आपल्या कब्जातील कोणत्याही आगीमुळे किंवा ज्वालाग्राही पदार्थामुळे मानवी जीवितास पोचणाऱ्या कोणत्याही संभाव्य धोक्यापासून सुरक्षित राहण्यास पुरेसा इतका बंदोबस्त अशा आगीबाबत किंवा ज्वालाग्राही पदार्थाबाबत करण्याचे जाणीवपूर्वक, किंवा हयगयीने टाळील, त्याला सहा महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा किंवा दोन हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.