Bns 2023 कलम २१७ : लोकसेवकाला आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचेल अशाप्रकारे करायला लावण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम २१७ :
लोकसेवकाला आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर दुसऱ्या व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचेल अशाप्रकारे करायला लावण्याच्या उद्देशाने खोटी माहिती देणे :
कलम : २१७
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : लोकसेवकाला आपल्या कायदेशीर अधिकाराचा वापर कोणत्याही व्यक्तीला क्षती किंवा त्रास होईल अशा प्रकारे करायला लावण्यासाठी त्याला खोटी माहिती देणे.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास किंवा १०००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
जी माहिती खोटी असल्याचे स्वत:ला माहीत आहे किंवा तसे स्वत: समजत आहे अशी कोणतीही माहिती जर कोणी एखाद्या लोकसेवकाला दिली आणि त्यामुळे अशा लोकसेवकाला-
(a) क) ज्याबाबत अशी माहिती देण्यात आली आहे त्याबाबतची खरी वस्तुस्थिती त्याला ज्ञात (माहीत) असता जे अशा लोकसेवकाने करता कामा नये अगर करण्याचे टाळले पाहिजे असे काहीही करणे किंवा टाळणे, किंवा
(b) ख) अशा लोकसेवकाला असलेला कायदेशीर अधिकार एखाद्या व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचेल अगर त्रास होईल अशा प्रकार वापरणे,
हे भाग पडले असा त्याचा उद्देश असेल किंवा त्यामुळे तसे घडण्यास आपण कारण होण्याचा संभव आहे याची जाणीव असेल तर, त्याला एक वर्षापर्यंत असू शकेल इतकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा, किंवा दहा हजार रूपयांपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरणे :
(a) क) (क) एका दंडाधिकाऱ्याला, अशा दंडाधिकाऱ्याच्या हाताखालील एक पोलीस अधिकारी (य) हा कर्तव्याची उपेक्षा करण्याबद्दल किंवा गैरवर्तनाबद्दल दोषी आहे अशी माहिती, ती खोटी असल्याचे माहीत असूनही आणि त्या माहितीमुळे (य) ला पदच्युत करणे दंडाधिकाऱ्याला भाग पडेल असा संभव असल्याची जाणीव असूनही देतो. (क) ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केला आहे.
(b) ख) (क) एका लोकसेवकाला, (य) पाशी प्रतिषिद्ध मीठ असून ते गुप्त ठिकाणी ठेवले आहे अशी खोटी माहिती, ती खोटी असल्याचे माहीत असूनही आणि त्या माहितीच्या परिणामी (य) च्या जागेची झडती घेतली जाऊन (य) ला त्रास होण्याचा संभव आहे याची जाणीव असूनही देतो. (क) ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केला आहे.
(c) ग) एका विशिष्ट गावाच्या आसपासच्या भागात आपल्यावर हल्ला होऊन जबरी चोरी करण्यात आली अशी खोटी माहिती (क) एका पोलिसाला देतो. आपल्यावर हल्ला करणाऱ्यांपैकी म्हणून तो कोणाचेही नाव सांगत नाही, पण या माहितीचा परिणाम म्हणून पोलीस चौकशी चालवून झडत्या घेण्यास सुरवात करतील व त्यायोगे गावकऱ्यांना किंवा त्यांच्यापैकी काहींना त्रास होण्याचा संभव आहे याची जाणीव आहे. (क) ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केला आहे.

This Post Has One Comment

Leave a Reply