Bns 2023 कलम १९ : अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १९ :
अपहानी करण्याचा संभव असलेली, पण गुन्हेगारी उद्देश नसताना अन्य नुकसान होऊ नये म्हणून केलेली कृती :
कोणतीही गोष्ट (कृती) जर अपहानी करण्याचा गुन्हेगारी उद्देश नसताना आणि शरीराची किंवा मालमत्तेची अन्य अपहानी होऊ नये म्हणून किंवा ती टाळण्यासाठी सद्भावनापूर्वक केलेली असेल तर, त्या गोष्टीमुळे (कृतीमुळे) अपहानी होणे संभवनीय आहे याची जाणीव असताना ती केली गेली एवढ्याच केवळ कारणाने ती गोष्ट अपराध होत नाही.
स्पष्टीकरण :
जिला प्रतिबंध करावयाचा किंवा जी टाळावयाची ती अपहानी (नुकसान) किंवा धोका अशा स्वरूपाचा किंवा इतका अतिनिकट होता काय की, ज्यायोगे ती कृती तिच्यामुळे नुकसान होण्याचा संभव आहे अशी जाणीव असताना करणे हे समर्थनीय किंवा क्षम्य होईल हा अशा प्रकरणी तथ्याचा प्रश्न असतो.
उदाहरणे :
(a) क) आगबोटीचचा कप्तान (क) अकस्मात आणि त्याच्या पक्षी कोणताही दोष किंवा हयगय नसताना, अशा परिस्थितीत सापडतो की , आगबोट थांबवू शकण्यापूर्वी त्याने आपल्या बोटीचा मार्ग बदलला नाही तर, अपरिहार्यपणे (ख) या बोटीशी टक्कर होऊन तिच्यावरील वीस किंवा तीस उतारुंसह ती बुडणार, आणि मार्ग बदलल्यास त्यामुळे (ग) या बोटीशी टक्कर होऊन तिच्यावरील फक्त दोन उतारुंसह ती बुडण्याचा धोका त्याला पत्करावा लागणार, पण त्यातून तो कदाचित पारही पडू शकेल. याबाबतीत जर (ग) या बोटीशी टक्कर करुन तिला बुडवण्याचा कोणताही उद्देश नसताना व (ख) या बोटीतील उतारुंना होणारा धोका टाळण्यासाठी सद्भावपूर्वक (क) ने आपला मार्ग बदलला आणि जीमुळे परिणामी (ग) या बोटीशी टक्कर होऊन ती बुडण्याचा संभव आहे हे त्याला माहीत होते ती कृती करुन त्याने ती बोट बुडवली तरी, जर अशी वस्तुस्थिती आढळून आली की, जो धोका टाळण्याचा त्याचा उद्देश होता तो अशा प्रकारचा होता की जेणेकरुन, (ग) या बोटीशी टक्कर होऊन ती बुडण्याचा धोका पत्करणे क्षम्य होईल तर, तो अपराधाबद्दल दोषी होत नाही.
(b) ख) मोठी आग लागली असता, तो भडका पसरु नये यासाठी (क) घरे पाडून टाकतो. मानवी जीवित किंवा मालमत्ता वाचवण्याच्या उद्देशाने सद्भावपूर्वक तो हे करतो. याबाबतीत, टाळावयाची अपहानी अशा स्वरुपाची व इतकी अतिनिकट होती की, ज्यायोगे (क) ची कृती क्षम्य ठरते असे आढळून आल्यास, (क) त्या अपराधाबद्दल दोषी होत नाही.

This Post Has One Comment

Leave a Reply