भारतीय न्याय संहिता २०२३
प्रकरण १२ :
लोकसेवकांकडून किंवा त्यांच्यासंबंधी घडणाऱ्या अपराधांविषयी :
कलम १९८ :
कोणत्याही व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे :
कलम : १९८
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीला क्षती (नुकसान) पोचवण्याच्या उद्देशाने लोकसेवकाने कायद्याची अवज्ञा करणे.
शिक्षा : १ वर्षांचा साधा कारावास, किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : अदखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
जर कोणी लोकसेवक असून, आणि त्याने स्वत: कशा प्रकारे आचरण करावे याबाबत कायद्यामधील तरतुदींची जाणीवपूर्वक अवज्ञा केली असेल आणि अशा अवज्ञेमुळे कोणत्याही व्यक्तीला क्षती (नुकसान) व्हावे असा उद्देश असेल किंवा तसे होण्यास आपण कारण होऊ याची त्यास जाणीव असेल तर, त्याला एक वर्षपर्यंत असू शकेल इतक्या साध्या कारावासाची, किंवा द्रव्यदंडाची, किंवा दोन्ही शिक्षा होतील.
उदाहरण :
(क) या अधिकाऱ्याला न्यायालयाने (य) च्या बाजूने अधिघोषित केलेल्या हुकूमनाम्याची पूर्ती करण्यासाठी त्याची अंमलबजावणी म्हणून मालमत्ता ताब्यात घेण्यास विधित: निदेशित करण्यात आले असून, त्या विधि निदेशाची अवज्ञा झाल्यास आपणांकडून (य) ला क्षती पोचणे संभवनीय असल्याचे माहीत असता (क) जाणीवपूर्वक अवज्ञा करतो. (क) ने या कलमात व्याख्या करण्यात आलेला अपराध केलेला आहे.
Pingback: Ipc कलम १६६ : कोणत्याही व्यक्तीला क्षती पोचवण्याच्या..