Bns 2023 कलम १७० : लाचलुचपत :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १७० :
लाचलुचपत :
१) जो कोणी –
एक) कोणत्याही व्यक्तीस कोणत्याही निवडणूकविषयक हक्क वापरण्यासाठी तिला किंवा अन्य कोणाही व्यक्तीला प्रवृत्त करण्याच्या अथवा असा कोणताही हक्क वापरण्याबद्दल कोणत्याही व्यक्तीला बक्षिसी देण्याच्या हेतूने लाच देतो. अथवा,
दोन) असा कोणताही हक्क वापरण्याबद्दल अथवा असा कोणताही हक्क वापरण्यासाठी अन्य कोणत्याही व्यक्तीला प्रवृत्त करण्याकरिता किंवा प्रवृत्त करण्याचा प्रयत्न करण्याकरिता बक्षिसी म्हणून कोणतीही परितोषण (लाच) स्वत:करिता किंवा अन्य कोणत्याही व्यक्तीकरिता स्वीकारतो, तर त्याने लाचलुचपतीचा अपराध केला असे होते :
परंतु लोक धोरण जाहीर करणे किंवा लोकोपयोगी कारवाईचे वचन देणे हा या कलमाखाली अपराध होणार नाही.
२) जी व्यक्ती एखादे परितोषण (लाच) देऊ करील, किंवा देण्याचे कबूल करील, अथवा ते मिळवून देण्याची तयारी दर्शवील, किंवा तसा प्रयत्न करील, तर ती परितोषण (लाच) देते असे मानले जाईल.
३) जी व्यक्ती एखादे परितोषण (लाच) मिळवील किंवा स्वीकारण्याचे कबूल करील किंवा मिळवण्याचा प्रयत्न करील तर ती परितोषण (लाच) स्वीकारते असे मानले जाईल आणि जी व्यक्ती आपणांस जे करणे उद्देशित नाही त्यासाठी प्रलोभन म्हणून किंवा आपण जे केलेले नाही त्याबद्दल बक्षिसी म्हणून एखादे परितोषण (लाच) स्वीकारते तिने बक्षिसी म्हणून ते परितोषण (लाच) स्वीकारली आहे, असे मानले जाईल.

This Post Has One Comment

Leave a Reply