Bns 2023 कलम १२७ : गैर परिरोध :

भारतीय न्याय संहिता २०२३
कलम १२७ :
गैर परिरोध :
कलम : १२७ (२)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीला गैरपणे परिरुद्ध करणे.
शिक्षा : १ वर्षाचा कारावास, किंवा ५००० रुपये द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : निरुद्ध किंवा परिरुद्ध केलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १२७ (३)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : तीन दिवस किंवा त्याहून अधिक काळ परिरुद्ध करणे.
शिक्षा : ३ वर्षाचा कारावास, किंवा १०००० रुपए द्रव्यदंड किंवा दोन्ही.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : परिरुद्ध केलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १२७ (४)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : दहा दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरपणे परिरुद्ध करणे.
शिक्षा : ५ वर्षाचा कारावास व १०००० रुपए द्रव्यदंड .
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र.
जामीनपात्र / अजामीनपात्र : अजामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : परिरुद्ध केलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : १२७ (५)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कोणत्याही व्यक्तीच्या मुक्ततेकरिता प्राधिलेख काढलेला आहे हे माहीत असताना, त्या व्यक्तीस गैरपणे परिरुद्ध करुन ठेवणे.
शिक्षा : कोणत्याही कलमाखालील कारावासा व्यतिरिक्त २ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : १२७ (६)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : एखाद्या व्यक्तीला गुप्तस्थळी गैरपणे परिरुद्ध करणे.
शिक्षा : कोणत्याही कलमाखालील कारावासा व्यतिरिक्त ३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड.
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : परिरुद्ध केलेली व्यक्ती.
कोणत्या नायालयात विचारणीय : प्रथम वर्ग दंडाधिकारी.
———
कलम : १२७ (७)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध कृती, इत्यादी करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी गैर परिरोध.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
कलम : १२७ (८)
अपराधाचे वर्गीकरण :
अपराध : कबुलीजबाब किंवा माहिती जबरीने घेण्यासाठी अथवा मालमत्ता, इत्यादी परत करण्यास भाग पाडण्यासाठी परिरोध.
शिक्षा : ३ वर्षांचा कारावास व द्रव्यदंड
दखलपात्र / अदखलपात्र : दखलपात्र
जामीनपात्र / अजामीनपात्र : जामीनपात्र.
शमनीय / अशमनीय : अशमनीय.
कोणत्या नायालयात विचारणीय : कोणताही दंडाधिकारी.
———
१) जो कोणी एखाद्या व्यक्तीस विवक्षित वेढणाऱ्या सीमांच्या पलीकडे जाण्यास प्रतिबंध होईल अशा रीतीने तिला गैरपणे निरुद्ध करतो तो त्या व्यक्तीस गैरपणे परिरुद्ध करतो असे म्हटले जाते.
उदाहरणे :
(a) क) (क) हा (य) ला भिंतींनी बांधलेल्या आवारात जायला लावतो आणि कुलूप लावून (य) ला आत कोंडतो. अशा प्रकारे वेढणाऱ्या भिंतींच्या मर्यादेपलिकडे कोणत्याही दिशेने जाण्यास (य) ला प्रतिबंध होतो. (क) ने (य) ला गैरपणे परिरुद्ध केले असे होते.
(b) ख) इमारतीमधून बाहेर पडण्याच्या मार्गावर (क) दारुगोळा हत्यारांनिशी सज्ज असलेल्या माणसांना उभे करतो आणि (य) ने इमारतीतून निघून जाण्याचा प्रयत्न केल्यास ती माणसे (य) वर गोळी झाडतील असे (य) ला सांगतो. (क) हा (य) ला गैरपणे परिरुद्ध करतो.
२) जो कोणी कोणत्याही व्यक्तीस गैरपणे परिरुद्ध करील त्याला, एक वर्षापर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा पाच हजार रुपयेपर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाजी किंवा दोन्ही शिक्षा होतील.
३) जो कोणी कोणत्याही व्यक्तीस तीन दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरपणे परिरुद्ध करील त्याला, तीन वर्षेपर्यन्त असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची किंवा दहा हजार रुपयापर्यंत असू शकेल इतक्या द्रव्यदंडाची किंवा दोन्ही शिक्षा होतील.
४) जो कोणी कोणत्याही व्यक्तीस दहा दिवस किंवा त्याहून अधिक काळ गैरपणे परिरुद्ध करील त्याला, पाच वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो दहा हजार रुपयांपेक्षा कमी नसेल इतक्या द्रव्यदंडासही पात्र होईल.
५) एखाद्या व्यक्तीच्या सुटकेसाठी रीतसर प्राधिलेख काढण्यात आला आहे हे माहीत असून जो कोणी त्या व्यक्तीला गैरपरणे परिरुद्ध करुन ठेवील त्याला, या प्रकरणातील अन्य कोणत्याही कलमान्वये तो ज्यास पात्र असेल अशा कोणत्याही मुदतीच्या कारावासाशिवाय अधिक (आणखी) दोन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीच्या दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
६) एखाद्या व्यक्तीला परिरुद्ध केल्यास याप्रमाणे परिरुद्ध होणाऱ्या व्यक्तीमध्ये हितसंबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीस किंवा कोणत्याही लोकसेवकास ते कळू नये अथवा यात यापूर्वी निर्दिष्ट केलेल्या अशा कोणत्याही व्यक्तीस किंवा लोकसेवकास अशा परिरोधाची जागा कळू नये किंवा शोधता येऊ नये असा उद्देश सूचित होईल, अशा रितीने जो कोणी तिला गैरपणे परिरुद्ध करील त्याला, अशा गैर परिरोधाबद्दल तो ज्या अन्य कोणत्याही शिक्षेस पात्र असेल तिच्या व्यतिरिक्त आणखी तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची दोन्ही पैकी कोणत्या तरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र ठरेल.
७) जर कोणी एखाद्या व्यक्तीस गैरपणे परिरुद्ध केले आणि त्यामागे, त्या परिरुद्ध व्यक्तीकडून किंवा परिरुद्ध व्यक्तीमध्ये हितसंबंधित असलेल्या कोणत्याही व्यक्तीकडून कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा जबरीने घेण्याचा अथवा अवैध असे काहीतरी करण्यास किंवा ज्यामुळे अपराध करणे सुकर होऊ शकेल अशी कोणतीही माहिती देण्यास परिरुद्ध व्यक्ती किंवा अशा व्यक्तीमध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही व्यक्ती यांना जबरीने भाग पाडण्याचा त्याचा इरादा असेल तर, त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.
८) जर कोणी एखाद्या व्यक्तीस गैरपणे परिरुद्ध केले आणि त्यामागे, एखाद्या अपराधाचा किंवा गैरवर्तणुकीचा ज्यामुळे तलास लागू शकेल असा कोणताही कबुलीजबाब किंवा कोणतीही माहिती परिरुद्ध व्यक्तीमध्ये हितसंबधित असलेली कोणतीही व्यक्ती यांच्याकडून जबरीने घेण्याचा त्याचा इरादा असेल अथवा कोणतीही मालमत्ता किंवा मुल्यवान रोखा परत करण्यास किंवा परत करवण्यास अगर कोणतीही हक्कमागणी किंवा मागणी पूर्ण करण्यास अगर ज्यामुळे कोणतीही मालमत्ता किंवा मूल्यवान रोखा परत मिळू शकेल अशी माहिती देण्यास परिरुद्ध व्यक्ती किंवा तिच्यामध्ये हितसंबंधित असलेली कोणतीही व्यक्ती यांना जबरीने भाग पाडण्याचा त्याचा इरादा (उद्देश) असेल तर, त्याला तीन वर्षेपर्यंत असू शकेल इतक्या मुदतीची कोणत्यातरी एका वर्णनाच्या कारावासाची शिक्षा होईल, व तो द्रव्यदंडासही पात्र होईल.

Leave a Reply