Arms act कलम ३३ : कंपन्यांनी केलेले अपराध :

शस्त्र अधिनियम १९५९
कलम ३३ :
कंपन्यांनी केलेले अपराध :
१) जेव्हा केव्हा या अधिनियमाखालील अपराध एखाद्या कंपनीकडून घडला असेल तेव्हा, अपराध घडला त्यावेळी कंपनीच्या धंद्याच्या चालनाबाबत कंपनीची प्रभारी व तिला जबाबदार असलेली प्रत्येक व्यक्ती, तसेच कंपनीही अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानले जाईल आणि त्यांच्याविरूद्ध कार्यवाही होण्यास व त्यानुसार शिक्षा होण्यास त्या पात्र असतील :
परंतु अपराध आपल्या नकळत घडला आणि असा अपराध घडू नये यासाठी आपण सर्व प्रकारे यथायोग्य तत्परता दाखवली होती असे त्या व्यक्तीने शाबीत केल्यास, या अधिनियमातील कशामुळेही अशी कोणतीही व्यक्ती या अधिनियमानुसार कोणत्याही शिक्षेस पात्र होणार नाही.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, जर या अधिनियमाखालील अपराध कंपनीकडून घडला असेल आणि कंपनीचा कोणताही संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी यांच्या संमतीने किंवा मूकानुमतीने अपराध घडला आहे किंवा त्याच्याकडून झालेल्या कोणत्याही हलगर्जीपणाशी त्या अपराधाचा कारणसंबंध जोडता येण्यासारखा आहे असे शाबीत करण्यात आले तर, असा संचालक, व्यवस्थापक, सचिव किंवा अन्य अधिकारी त्या अपराधाबद्दल दोषी असल्याचे मानण्यात येईल आणि त्याच्याविरूद्ध कार्यवाही होण्यास आणि त्यानुसार शिक्षा होण्यास ताो पात्र असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनासाठी, –
(a)क)(अ) कंपनी याचा अर्थ कोणताही निगम-निकाय असून त्यामध्ये, पेढी किवा अन्य व्यक्तिसंघ यांचा समावेश आहे; आणि
(b)ख)(ब) संचालक याचा पेढीच्या संबंधातील अर्थ, पेढीतील भागीदार असा आहे.

Leave a Reply