शस्त्र अधिनियम १९५९
कलम ८ :
ओळखचिन्हे अंकित नसलेल्या अग्निशस्त्रांची विक्री किंवा हस्तांतरण करण्यास मनाई :
१) कोणत्याही व्यक्तीने १.(अग्निशस्त्रांवर किंवा दारु गोळ्यावर) ठसवलेले किंवा अन्यथा दर्शवलेले कोणतेही नाव किंवा क्रमांक अन्य ओळखचिन्हे पुसून टाकता कामा नये, काढून टाकता कामा नये, त्यात फेरबदल करता कामा नये किंवा त्याचे बनावटीकरण करता कामा नये.
२) कोणत्याही व्यक्तीने ज्यावर बनवण्याचे नाव, निर्माणकाचा क्रमांक किंवा अन्य ओळखचिन्ह ठसवलेले किंवा केंद्र शासनाने मान्य केलेल्या रीतीने अन्यथा दर्शविण्यात आलेले नसेल असे कोणतेही अग्निशस्त्र विकता कामा नये किंवा हस्तांतरित करता कामा नये.
३) जेव्हा जेव्हा कोणत्याही व्यक्तीच्या कब्जात असे नाव, किंवा अन्य ओळखचिन्ह नसलेले किंवा ज्यावरून असे नाव, क्रमांक किंवा अन्य ओळखचिन्ह पुसून टाकण्यात, काढून टाकण्यात आलेले आहे, त्यात फेरबदल करण्यात किंवा त्याचे बनावटीकरण करण्यात आलेले आहे अशी कोणतीही अग्निशस्त्रे असतील तेव्हा तेव्हा, विरूद्ध शाबीत न झाल्यास, ते नाव, क्रमांक किंवा अन्य ओळखचिन्ह अशा व्यक्तीने पुसून टाकले, काढून टाकले, त्यात फेरबदल केला किंवा त्याचे बनावटीकरण केले असे गृहीत धरण्यात येईल :
परंतु, ज्यावर असे नाव, क्रमांक किंवा अन्य ओळखचिन्ह ठसवलेले किंवा अन्यथा दर्शविण्यात आलेले नाही असे कोणतेही अग्निशस्त्र या अधिनियमाच्या प्रारंभाच्या वेळी ज्याच्या कब्जात असेल अशा व्यक्तीच्या संबंधात, या पोटकलमाचे उपबंध, अशा प्रारंभापासून एक वर्ष संपेपर्यंत परिणामक होणार नाहीत.
———
१. २०१९ चा ४८ कलम ६ द्वारा (१४-१२-२०१९ पासून) (अग्निशस्त्रांवर) शब्दा ऐवजी समाविष्ट करण्यात आले.