Arms act कलम ३ : अग्निशस्त्रे व दारूगोळा संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन :

शस्त्र अधिनियम १९५९
प्रकरण २ :
शस्त्रे व दारुगोळा यांचे संपादन, कब्जा, निर्मिती, विक्री, आयात, निर्यात व वाहतुक :
कलम ३ :
अग्निशस्त्रे व दारूगोळा संपादन करण्यासाठी व कब्जात ठेवण्यासाठी लायसन :
१.(१) कोणतीही व्यक्ती, या अधिनियमाचे उपबंध व त्याखाली केलेले नियम यांच्या अनुसार याबाबतीत दिलेले लायसन तिने धारण केले नसल्यास कोणतेही अग्निशास्त्र किंवा दारूगोळा संपादन करणार नाही, स्वत:च्या कब्जात ठेवणार नाही किंवा बरोबर बाळगणार नाही;
परंतु, स्वत: लायसन धारण करत नसताना, एखाद्या व्यक्तीला लायसन धारकाच्या समक्ष किंवा त्याच्या लेखी प्राधिकरणान्वये कोणतेही अग्निशास्त्र किंवा दारूगोळा दुरूस्तीकरिता किंवा लायसनच्या नवीकरणाकरिता किंवा अशा धारकाच्या उपयोगाकरिता बरोबर बाळगता येईल.)
२.(२) पोटकलम १) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, पोटकलम ३) मध्ये निर्दिष्ट केलेल्या व्यक्तीखेरीज इतर कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही वेळी, ३.(दोनपेक्षा अधिक अग्निशस्त्रे) संपादन करता येणार नाहीत, स्वत:च्या कब्जात ठेवता येणार नाहीत किंवा बरोबर बाळगता येणार नाहीत :
४.(परंतु, शस्त्रास्त्र (सुधारणा) अधिनियम २०१९ च्या प्रारंभाच्या वेळी ज्या व्यक्तीकडे दोन पेक्षा अधिक अग्निशस्त्र (बंदुक) असतील, अशा व्यक्तीने यापैकी दोन अग्निशस्त्र (बंदुक) आपल्याजवळ ठेवू शकते आणि अशा प्रारंभा पासून एक वर्षाच्या आत, उरलेले एक अग्निशस्त्र (बंदुक) सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकारी कडे किंवा कलम २१ च्या पोटकलम (१) च्या प्रयोजनासाठी विहित करण्यात येतील अशा शर्तीच्या अधीनतेने लायसनधारक व्यापाऱ्याकडे किंवा पोटलकलमात निर्दिष्ट केल्याप्रमाणे अशी व्यक्ती संघराज्याच्या सशस्त्र सेनेची सदस्य असल्यास पथक शस्त्रगारामध्ये तो निक्षिप्त करील,
सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याकडे किंवा विहित करण्यात येतील अशा शर्तीच्या अधीनतेने, लायसनधारक व्यापाऱ्याकडे किंवा जर अशी व्यक्ती संघराज्याच्या सशस्त्र सेनेची सदस्य असल्यास पथक शस्त्रगारामध्ये तो निक्षिप्त करील,
ज्यानंतर उपरोक्त एक वर्षाच्या समाप्तीच्या तारखेपासून नव्वद दिवसांच्या आत लायसन (परवाना) रद्द केले जाईल:
परंतु पुढे असे की, वारसा किंवा वारसाहक्काच्या आधारावर शस्त्र परवाना देताना, दोन अग्निशस्त्रांची (बंदुकांची) मर्यादा ओलांडली जाणार नाही.)
३) पोटकलम (२) मध्ये अंतर्भूत असलेली कोणतीही गोष्ट, अग्निशस्त्रांच्या कोणत्याही व्यापाऱ्याला किंवा केंद्र शासनाने लायसन दिलेल्या किंवा मान्यता दिलेल्या रायफल क्लबचा किंवा रायफल संघाचा जो कोणताही सदस्य नेमबाजीच्या सरावासाठी पॉईंट २२ बोअर रायफल किंवा हवाई रायफल वापरत असेल त्याला लागू होणार नाही.
४) कलम २१ ची पोटकलमे (२) ते (६) (दोन्ही धरून) यांचे उपबंध, हे त्या कलमाच्या पोटकलम (१) खाली निक्षिप्त केलेल्या कोणत्याही शस्त्राला किंवा दारूगोळ्याला असे लागू होतात तसेच ते, पोटकलम (२) च्या परंतुकाखाली निक्षिप्त केलेल्या कोणत्याही अग्निशस्त्रांच्या संबंधात लागू होतील.)
————-
१. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ३ द्वारे कलम ३ ला त्याचे पोटकलम (१) असा (२२-६-१९८३ पासून) नवीन क्रमांक दिला.
२. १९८३ चा अधिनियम क्रमांक २५ याच्या कलम ३ द्वारे पोटकलमे (२२-६-१९८३ पासून) समाविष्ट करण्यात आली.
३. २०१९ चा ४८ कलम ३ द्वारा (१४-१२-२०१९ पासून) (तीनपेक्षा अधिक अग्निशस्त्रे) शब्दांऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. २०१९ चा ४८ कलम ३ द्वारा (१४-१२-२०१९ पासून) परंतुक (परंतु, शस्त्र (विशोधन) अधिनियम, १९८३ (१९८३ चा २५) याच्या प्रारंभी ज्या व्यक्तीच्या कब्जात तीनपेक्षा जास्त अग्निशस्त्रे असतील अशा कोणत्याही व्यक्तीला, अशा अग्निशस्त्रांपैकी कोणतीही तीन अग्निशस्त्रे स्वत:जवळ ठेवून घेता येतील आणि अशा प्रारंभापासून नव्वद दिवसांच्या आत त्या व्यक्तीला उर्वरित अग्निशस्त्रे सर्वात जवळच्या पोलीस ठाण्याच्या अंमलदार अधिकाऱ्याकडे किंवा कलम २१ च्या पोटकलम (१) च्या प्रयोजनार्थ विहित करण्यात आल्या असतील अशा शर्तीच्या अधीनतेने, लायसनधारक व्यापाराकडे किंवा अशी व्यक्ती ही संघराज्याच्या सशस्त्र सेनादलाची सदस्य असेल अशा बाबतीत, पथक शस्त्रागारामध्ये ती निक्षिप्त करावी लागतील.) ऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply